कोल्हार : दुःख देऊन आनंद घेणे अध्यात्म नाही : महंत रामगिरी महाराज

कोल्हार : दुःख देऊन आनंद घेणे अध्यात्म नाही : महंत रामगिरी महाराज
Published on
Updated on

कोल्हार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अध्यात्मिक जीवन आनंद देणारे आहे. दुसर्‍याला दुःख व पीडा देऊन आसुरी आनंद घेणे म्हणजे अध्यात्म नाही. प्रत्येक जीवाला जगावे लागते परंतु काही वाईट प्रथेमुळे आजही देवी देवता समोर बकराचा बळी देण्याची प्रथा आहे, बकर्‍याला देवासमोर का मारावे? असा सवाल करीत अशा वाईट रूढी परंपरा संपवल्या पाहिजे, असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

कोल्हार भगवतीपूर येथे मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेचे तिसरे पुष्प गुंफतांना महंत रामगिरी बोलत होते. तिसरे पुष्प गुंफतांना त्यांनी सती व दक्ष राजा तसेच कर्दम ऋषी यांची कथा सांगितली व उपस्थितांना सुमधुर भजनाने मंत्रमुग्ध केले.

'मेरा मेरा कर क्या फल पाया, हरी के भजन बिना सब सुख गमाया' हे सुमधुर भजन सादर करीत त्यांनी दक्ष राजाची व सतीची कथा सांगितली. दक्ष म्हणजे सावध आणि माणसाने व्यवहारात सावध राहण्यापेक्षा आत्मकल्याणासाठी सावध राहावे. दक्ष राजाला अहंकार होता म्हणून त्याने भगवान शिवाला यज्ञासाठी बोलावले नाही. हा अपमान सतीला सहन झाल्या न झाल्याने सतीने यज्ञात उडी घेऊन भस्म झाली व दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला.

हे भगवान शिवाला समजल्यानंतर भगवान शिवाने क्रोधाने जटा आपटल्या व त्यातून वीर जन्माला आला ते म्हणजेच विरभद्र महाराज. या वीरभद्राला भगवान शिवाने आज्ञा दिली. वीरभद्राने दक्षाचे शिर छाटले. त्यानंतर सर्वांनी शिवस्तुती केल्यानंतर दक्ष राजाला शिवाने बकर्‍याचे शिर जोडले. बकर्‍याला अज म्हणतात, अज म्हणजे ब्रह्म. भगवान शिवाने दक्ष राजाला बकर्‍याचे शिर जोडून दक्षाला ब्रह्मदृष्टी दिली. भगवान शिव म्हणजे एक वेगळे सर्जन होते. त्यांनी पहिले ऑपरेशन केले ते गणपतीचे. त्याचे शीर उडवले त्याला हत्तीचे शिर जोडले तर दक्ष राजाला बकर्‍याचे शिर जोडले. धड एकाचे शिर दुसर्‍याचे असे असताना ऑपरेशन यशस्वी करणारे भगवान शिव एक वेगळेच सर्जन होते, असे सांगताच उपस्थितांमध्ये एक हशा झाला.

कर्दम ऋषींना नऊ कन्या होत्या व एक कपिल नावाचा पुत्र होता. या नऊ कन्यांच्या लग्नाची जबाबदारी ब्रह्मदेवाने घेतली होती. या नऊ कन्या म्हणजेच नववीध भक्तीचे प्रतीक दहावा कपिल म्हणजे ब्रह्मज्ञान होते. भक्ती केल्यानंतरच ज्ञान येते असे सांगत असताना त्यांनी 'अनादी निर्गुण प्रगटली भवानी' हे भक्ती गीत सादर करीत असताना उपस्थित भाविकांनी ठेकाधरीत मनसोक्त नृत्य केले. बाहेर पाऊस पडत असताना देखील तिसर्‍या दिवशी कथा ऐकण्यासाठी पावसाची तमा न करता अलोट जनसागर लोटला होता.
या सप्ताहाची चर्चा गावागावात पसरत असल्याने कथा ऐकण्यास भाविकांची गर्दी होत आहे.

अहंकारी माणसाला बकर्‍याचा जन्म

अहंकारामुळे दक्षाला बकर्‍याचे शिर जोडावे लागले. त्यामुळे जो माणूस अहंकारी असतो, त्याला पुढचा जन्म बकर्‍याचा मिळतो. मनुष्य प्राणी हे सर्व विश्वाच्या जननीचे लेकरं आहे. हे विश्व निर्माण करणारी जननीने आपल्या लेकराचे शीर कधीही कापायला सांगितले नाही. परंतु जिभेच्या चोचल्या पायी आज लोक बकर्‍याचा बळी देतात. ही कुप्रथा थांबवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news