

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्हा हा राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासोबतच आहे. सोमवारी आपण स्वतः त्यांची भेट घेऊन जिल्ह्याचा आढावा दिला आहे. मंगळवारी आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार नीलेश लंके हेदेखील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दै. पुढारीला दिली. शहरातील स्थितीबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
फाळके म्हणाले, सकाळी 7.30 वाजता शरद पवार यांची आपण पुणे येथील मोतीबागेतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी यांचा संपूर्ण आढावा दिला. नगरचा सर्वच राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. आमदार लहामटे यांनी यापूर्वीच शरद पवार यांच्यासोबत राहण्याचे त्यांना कळविले आहे.
मात्र ज्यांना कोणाला माझ्यासोबत राहायचे आहे, त्यांनी माझ्यासमोर नाही, तर माध्यमांसमोर ही भूमिका मांडायची आहे, अशा सूचना शरद पवार यांनी सर्व आमदारांसह पदाधिकार्यांना केल्या आहेत. त्यामुळे आमदार लहामटे यांनी मंगळवारी सकाळी 9 वाजता कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून, ते आपली भूमिका यात जाहीर करतील, तसेच आमदार लंके हेदेखील लवकरच भूमिका पुढे मांडणार आहेत.
आमदार आशुतोष काळे हे परदेशात असले तरी त्यांनी आपण शरद पवार यांच्यासमवेत असल्याचे त्यांना कळविले आहे, असेही फाळके यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्याविषयी विचारले असता, त्यांच्याबाबत मला काहीही माहिती नाही, शहरातील पक्ष पदाधिकार्यांना याबाबत माहिती असावी, असाही अंदाज त्यांनी आपल्या शैलीत व्यक्त केला.
हेही वाचा