Maharashtra Politics : फडणवीस, पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार?

Maharashtra Politics : फडणवीस, पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला वर्षापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचे संकेत मिळाले आहेत. अलीकडेच महाराष्ट्रातील शिंदे सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्री बनविले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत आगामी बदलासंदर्भात आढावा घेतला. बैठकीला अमित शहा, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी यांच्यासह प्रमुख मंत्री उपस्थित होते. मंत्रिमंडळ आणि भाजप संघटनेतील बदलांसंदर्भात मागील काही काळापासून भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. गृहमंत्री शहा आणि भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांची बंद दाराआड खलबते झाल्याने बदलांच्या शक्यतेला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल करताना चालू वर्षाच्या विधानसभा निवडणुका होणार्‍या राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणवर विशेष लक्ष दिले जाऊ शकते. परिणामी या राज्यांतील नेत्यांना जास्त प्रमाणात केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना संधी दिली जाणार असल्याचे कळते. त्यानुसार शिंदे गटाच्या दोन खासदारांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते.

अधिवेशनापूर्वी विस्तार अपेक्षित

येत्या 20 तारखेपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अंतिम विस्तार ठरू शकतो. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप नेतृत्वाकडून काही राज्यांत नेतृत्वबदलही केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news