अहमदनगर : जलजीवन कामांना विरोध नको; जिल्हाधिकारी सालीमठ, पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य

अहमदनगर : जलजीवन कामांना विरोध नको; जिल्हाधिकारी सालीमठ, पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पाणी टंचाईग्रस्त परिस्थितीला सातत्याने सामोरे जावे लागते. ही परिस्थिती कायमची दूर करण्यासाठी केंद्रीय जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेतली असून, कामे प्रगतिपथावर आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे या कामांना विरोध करू नका, असे आवाहन करीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विरोध करणार्‍या गावकर्‍यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात दीड हजार पाणीयोजनांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 900 कामांचा समावेश आहे. काही योजनांच्या कामांवर नागरिकांचा आक्षेप होता. काही ठिकाणी कामे बंद पाडली तर काहींनी धरणांतील पाणी देण्यास विरोध केला. आदी विविध कारणांमुळे हा जलजीवन मिशनची कामे वादाच्या भोवर्‍यात सापडली. त्यामुळे समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मंगळवारी विरोध, आक्षेप व कामे बंद पडणार्‍या नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस.बी. कदम, कार्यकारी अभियंता एस.आर. वारे, जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तसेच जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता सतीश बडे आणि विविध गावांतील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव बुद्रुक व मडेगाव, जामखेड तालुक्यातील खर्डा, नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर, तसेच संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर, जवळे बाळेश्वर, बोरी तसेच अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पारगाव बुद्रुक व मडेवडगाव या दोन्ही गावांच्या योजनेला कुकडी प्रकल्पातून, बुर्‍हाणपूर योजनेला मुळा धरणातून तर खर्डा योजनेला परंडा तालुक्यातून पाण्याचे स्रोेत उपलब्ध होणार आहेत.

निमगाव भोजापूरला आढळा धरण कृती समितीने विरोध दर्शविला. जवळे बाळेश्वर व ब्राह्मणवाडा पाणीयोजनेला पिंपळगाव खांड धरणातून पाणी दिले जाणार आहे. बोरी गावच्या नागरिकांनी ब्राह्मणवाडा योजनेला धरणातून पाणी देण्यास विरोध दर्शविला. कोणत्याही प्रकारे या प्रकल्पाला विरोध करू नका., असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news