अहमदनगर : पाणी टंचाई उपाययोजना आणखी महिनाभर; ऐन पावसाळ्यात 63 टँकर सुरू | पुढारी

अहमदनगर : पाणी टंचाई उपाययोजना आणखी महिनाभर; ऐन पावसाळ्यात 63 टँकर सुरू

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या ऐन पावसाळ्यात वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाई उपाययोजनांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आजमितीस पारनेर शहरासह जिल्ह्यातील 70 गावे आणि 406 वाड्यांत पाणीटंचाईच्या झळा सुरू आहेत. त्यामुळे 1 लाख 30 हजार जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक पारनेर तालुक्यात 22 टँकर धावत आहेत.

गेल्या वर्षी 141 टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्हाभरात पाण्याचा सुकाळ होता. नेहमीप्रमाणे संगमनेर, पारनेर, अकोले, नगर व पारनेर या तालुक्यांतील मोजक्याच गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दोन महिन्यांत जवळपास 40 गावांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. दर वर्षी पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबर ते 30 जूनपर्यंत टंचाई उपाययोजनांचा आराखडा तयार केला जातो. यंदा जूनअखेरपर्यंत 7 कोटी 32 लाख 52 हजार रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला होता. यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरूच होते. त्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी टंचाई उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. याशिवाय जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी 18 कोटी 10 लाख 3 हजार रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे.

जून महिन्यात दोन नक्षत्रे कोरडीठाक गेली. त्यामुळे अपेक्षित पावसाच्या 50 टक्केच पाऊस झाला. जुलै महिन्यात जूनपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिना कोरडाठाक गेला. त्यामुळे भूजलपातळी आणखी खाली गेली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी 30 सप्टेंबरपर्यंत टंचाई उपाययोजनांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढणार आहे.

3 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 60 गावे 348 वाड्यांत पाणीटंचाई असल्यामुळे 55 टँकर सुरू होते. 4 सप्टेंबर रोजी पारनेर नगरपालिकेसह 70 गावे आणि 406 वाड्यांतील 1 लाख 30 हजार 5 लोकसंख्या पावसाळ्यात पावसाबरोबरच टँकरची वाट पाहत आहे. सध्या 63 टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.

गावे, वाड्या व टँकरची संख्या

संगमनेर : 14- 33 (11)
नगर : 13 -42 (12)
पारनेर : 31-197 (22)
पाथर्डी : 11-102 (14)
पारनेर शहर : 1-32 (4).

हेही वाचा

अहमदनगर : पारंपरिक, डीजेमुक्त गणेश मंडळांना यंदा पारितोषिके; जिल्हा प्रशासनाची घोषणा

बीड : पोलिसांच्या सतर्कतेने बँक ऑफ महाराष्‍ट्रच्या एटीएमची रक्‍कम वाचली

Lalit Modi : सुष्मिता सेननंतर ललित मोदी सुपर मॉडल उज्ज्वला राऊतच्या प्रेमात?

Back to top button