

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : कमावत्या तरुण मुलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. नंतर त्यांच्यासोबत अनैतिक कृत्ये करायची आणि चित्रिकरण करायचे. नंतर पैशांची व प्रॉपर्टीची मागणी करायची..अशा 'हनी ट्रॅप'च्या मार्गाने पैसा मिळविण्याचा उद्योग नगरमध्ये पुन्हा सुरू झाला आहे. केडगावमधील असाच एक तरुण 'ती'च्या जाळ्यात अडकला असून, या अविवाहीत तरुणाने तिच्या नादाने रक्ताच्या नात्याशी काडीमोड घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संबंधित महिलेवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
केडगावात राहणारा सचिन (नाव बदलले आहे) हा गेल्या वर्षभरापासून मूळच्या नेप्ती येथील 'सुंदरी'च्या छायेत आहे. सचिनच्या आईच्या मालकीचे एक घर नगरमध्ये असल्याने त्याच घरात भाडेकरू म्हणून तिची आठ महिन्यांपूर्वी एन्ट्री झाली. तेव्हापासून सचिनचे अन् तिचे जवळचे संबंध आले. याच काळात सचिनचे गैरकृत्य करतानाचे व्हिडिओ तिने शूट केले. व्हिडिओ, फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत, तिने सचिनचा सोन्याचे अंडी देणार्या कोंबडीसारखा उपयोग सुरू केला.
तसेच, सचिन कायमस्वरुपी तिच्या छायेत राहावा, यासाठी तिने सचिनच्या घराच्या गॅलरीत जादूटोणा करण्याच्या उद्देशाने लिंबू आणि टाचण्या आणून टाकल्याची माहिती आहे. मुलगा पाहिजे असेल तर प्लॅट व तुझ्या नावाने असलेली जमीन तुझ्या मुलाच्या नावावर करून दे, नंतर मी माझ्या नावावर करून घेते, असे तिने त्याच्या आईला सुनावले. सचिनने आतापर्यंत मोबाईल, लॅपटॉपसह मोठी रक्कम तिच्या हवाली केल्याचे समजतेे. अखेर सचिनच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित महिलेवर जादूटोणाविरोधी कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा