मदतीचे आकडे कोटींचे, शेतकऱ्यांचे हात मात्र रिकामेच !

मदतीचे आकडे कोटींचे, शेतकऱ्यांचे हात मात्र रिकामेच !
Published on
Updated on

शेवगाव : तालुक्यात तीन वर्षांत अतिवृष्टी बाधीत शेतकर्‍यांना शंभर कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. नाशिक विभागात मदतीचा हा उच्चांक झाला आहे. मात्र मदतीच्या तुलनेत शेतकर्‍यांचे दहा पट नुकसान झाले आहे. मदत आणि खर्च व नुकसान पाहता शेतकरी हताश झाला असून सरकारची मदत शेतकर्‍यांसाठी समाधानकारक नाही.

दुष्काळी शेवगाव तालुका गत तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्माण होणार्‍या संकटाशी सामना करीत आहे. अतिवृष्टी, ढगफुटी, पूर व अवकाळी गारपीटने पिकांची खात्री कात्रीत सापडली आहे. या तालुक्यात 113 गावांत मुख्य शेती व्यवसायावर अवलंबून असणारे सुमारे 70 हजार शेतकरी आहेत. जायकवाडी फुगवटा भाग सोडता सर्व शेती निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग पावला, तर आमदानी आणि कोपला तर बरबादी, अशा अवस्थेत गेली तीन वर्षे बरबादीची ठरली आहेत. पिंकाच्या नुकसानीस शासनाने मदतीचा हातभार लावला मात्र तो अगदीच तुटपुंजा ठरला.

तीन वर्षे शासनाने अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांना हेक्टरी 10 हजार रुपये प्रमाणे 112 कोटी 52 लाख 33 हजार 924 रुपये मदतीचे वाटप केले आहे. यात सन 2019-20 मध्ये सुमारे 49 हजार 406 बाधित शेतकर्‍यांना 32 हजार 645 हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्रास 32 कोटी 64 लाख 58 हजार 609 रुपये, सन 2020-21 मध्ये 61 हजार 46 शेतकर्‍यांना 44 हजार 811 हेक्टर क्षेत्रास 44 कोटी 81 लाख 17 हजार 384 रुपये, सन 2021-22 मध्ये 59 हजार 506 शेतकर्‍यांना 34 हजार 323 हेक्टर क्षेत्रास 34 कोटी 32 लाख 35 हजार 563 रुपये असे तीन वर्षांत एकूण 111 कोटी 78 लाख 11 हजार 556 रुपये मदतीचे वाटप करण्यात आले.

जानेवारी 2020 मध्ये गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 18 लाख 30 हजार 905 रुपये, मे 2021 मध्ये अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीस 34 लाख 91 हजार 463 रुपये, तर ऑगस्ट 2021 मध्ये पुरात वाहून मृत्यू झालेल्या वडुले येथील मुरलीधर सागडे यांच्या वारसांस 4 लाख रुपयांची मदत करण्यात आली.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नगर येथील सिव्हिल रुग्णालय जळीताची घटना घडली होती. या घटनेत तालुक्यातील आसराबाई नांगरे, सीताराम जाधव, लक्ष्मण सावळकर यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांस जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रत्येकी 4 लाख व मुख्यमंत्री सहाय्य निधीचे प्रत्येकी 3 लाख अशी एकूण 21 लाख रुपयांची मदत देण्यात आली. तीन वर्षांत एकूण 112 कोटी 52 लाख 33 हजार 924 रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

सन 2019-20 व 2020-21 मध्ये 113 गावांतील शेतकर्‍यांना मदत मिळाली. सन 2021-22 मध्ये म्हणजे भातकुडगाव, ढोरजळगाव मंडळ वगळता 79 गावांतील शेतकर्‍यांनाच मदतीचे वाटप झाले. वास्तविक अतिवृष्टीने मिळालेल्या मदतीच्या दहा पट नुकसान शेतकर्‍यांच्या पिकांचे झाले आहे. त्यामुळे हेक्टरी 25 हजार रुपये मदत मिळणे अपेक्षीत असताना शासनाने दिलेली हेक्टरी 10 हजार रुपये मदत ही शेतकर्‍यांच्या मनगटावर चुना लावल्यागत आहे.

अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतिक्षेतच

शेवगाव तालुक्यात 30 व 31 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने नदीच्या पुरात आखेगाव डोंगर, आखेगाव तितर्फा, खरडगाव, वरूर बुद्रुक, वरुर खुर्द, भगुर, शेवगाव, वडुले, जोहरापूर, कांबी, हातगाव, गायकवाड जळगाव येथील शेतकर्‍यांची जनावरे पुरात वाहून गेली. घरांची पडझड झाली. विहिरी बुजल्या. पिकांसह शेतातील माती वाहून गेली.

संसारपयोगी साहित्य वाहून गेले. घरांची पडझड झाली. त्यासाठी अद्याप मदत मिळालेली नाही. तसेच दोन वर्षांपूर्वी जायकवाडी जलाशय काठोकाठ भरल्याने फुगवट्याखालील क्षेत्रात पाणी शिरल्याने ऊसासह इतर पिकांचे नुकसान झाले. त्याचीही अद्याप मदत मिळाली नसल्याने ती देण्याची मागणी संतप्त शेतकरी करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news