पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी एयरलाईन्स गो फर्स्टवर गंभीर आरोप केले आहेत. एअरलाईनने पैशांसाठी चुकीचा मार्ग अवलंबला असल्याचे आरोप कौशिक यांनी केले आहेत. एअरलाईन्सकडून झालेल्या गैरवर्तनाबद्दल त्यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये, सतीश कौशिक यांनी सांगितले आहे की, GoFirst Air Line ने त्यांच्या प्रवाशांकडून गैरवर्तन आणि फसवणूक करून पैसे कमवण्याची पद्धत कशी अवलंबली आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि अभिनेते कौशिक यांनी गो फर्स्ट एअरलाईन्सवर अन्यायकारकपणे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. त्यांनी फ्लाईटमधील एका सीटबद्दल आपल्याशी कशी वागणूक दिली गेली हे सांगितले. एकामागून एक पोस्ट करत त्यांनी संपूर्ण घटना तपशीलवार सांगितली आहे.
कौशिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एअरलाईन्स फ्लाईट जर्नीशी संबंधित घटनेचे तपशीलवार वर्णन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'हे खूप दु:खद आहे की, गो फर्स्ट एअरवेजने प्रवाशांकडून पैसे कमवण्यासाठी चुकीचा मार्ग शोधला आहे. माझ्या ऑफिसमधील (कौशिक/अजय राय) २ सीट्स पहिल्या रांगेतील मधल्या सीटसह २५ हजार रुपयांना बूक केल्या होत्या. माझ्या ऑफिसने पैसे भरले असताना या लोकांनी ती सीट दुसऱ्या प्रवाशाला विकली.
कौशिक यांनी पुढील ट्विटमध्ये लिहिले की, 'हे योग्य आहे का? प्रवाशाला त्रास देऊन अधिक पैसे कमवण्याचा हा मार्ग आहे का? पैसे परत मिळणे ही बाब नसून तुमचे ऐकण्याची बाब आहे. मी फ्लाईट थांबवू शकलो असतो पण मी तसे केले नाही कारण बाकीचे पाहता, मला वाटले की सगळे आधीच ३ तास थांबले आहेत. गुडलक गो फर्स्ट एयरवे.'
सतीशने आपल्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हा मदत मागितली गेली तेव्हा त्याला सांगण्यात आले की प्रवासी पुढच्या फ्लाइटमध्ये जाईल, पण प्रवासी त्याच फ्लाइटमधील होता. सतीशने लिहिले की, 'जेव्हा त्या प्रवाशाला जागा मिळाली नाही, तेव्हा फ्लाइट थांबवण्यात आली. त्यानंतर मी त्याला जागा देण्याचे ठरवले. चांगली गोष्ट म्हणजे फ्लाRट अटेंडंट आणि एअर होस्टेसने यासाठी माझे आभार मानले. त्या सीटचे माझे पैसे परत मिळतील असेही त्यांनी सांगितले. पण मी त्यांना सांगितले की असे कधीच होणार नाही. परिणामी विमान कंपनीने परतावा देण्यास नकार दिलाय.