

श्रीरामपूर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : जुन्या वादाच्या कारणावरून शहराजवळील गोंधवणी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्री तरूणावर चॉपरने वार करून खून केल्याची घटना घडली. सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे. तन्वीर शहा असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. रूपेश शिंदे (बाबजी) व सुनील देवकर असे आरोपींची नावे आहेत.
खूनाच्या घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले आहेत. खून झालेल्या तन्वीर शहरावर तसेच आरोपींवरही शहर पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे टोळीयुध्दाच्या कारणावरून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मयत तन्वीर शहा व आरोपींची गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. त्यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाचीच्या झाल्याच्या घटना घडल्या असल्याची चर्चा सुरु आहे. या वादातूनच आरोपींनी शहा याचा काटा काढल्याची चर्चा गोंधवणी परिसरात आहे. तसेच या घटनेला नाजूक संबंधाचेही कंगोरे असल्याचीही चर्चा आहे. मयत हा गोंधवणी येथील एका संघटनेच्या पदाधिकार्याचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचेही कळते. यासर्व बाबींचा तपास पोलिस करीत आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे.
हे ही वाचा :