नगर : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने 6 गायींचा मृत्यू ; तांदुळवाडीतील घटना | पुढारी

नगर : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने 6 गायींचा मृत्यू ; तांदुळवाडीतील घटना

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्याच्या पूर्व भागातील तांदुळवाडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने 6 शेतकर्‍यांच्या गायांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मे महिन्यात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रात्रीच्या वेळी गावातील एका महिलेसह काही जनावरांना चावा घेतला होता. त्यानंतर पिसाळलेला कुत्रा मरण पावला. परंतु त्यानंतर गावातील दोन तीन गायी व कालवडी दगावल्या. त्यामुळे काही जनावरांना या कुत्र्याने चावा घेतल्याचे लक्षात आले. त्यावर नागरिकांनी उपचार देखील केले.

परंतु गायी दगावण्याच्या संख्येत वाढ होत एकापाठोपाठ एक अशा आज मितीस सुमारे 6 गायी दगावल्याने शेतकर्‍यांनी धास्ती घेतली आहे. दरम्यान, संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याने नेमका किती जनावरांना चावा घेतला? याची माहिती नसल्याने ज्या शेतकर्‍यांच्या जनावरांना जखम झाली असेल त्यांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. सदर आजार हा संसर्गजन्य नाही, असे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. गेल्या काही दिवसामध्ये गावामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. यापुर्वीही काही ग्रामस्थांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत. लहान मुलेही यामधून सुटलेले नाहीत. त्यामुळे एखादी मोठी घडण्याआधी या मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शेतकर्‍यांनी काळजी करण्याचे कारण नाही
तांदुळवाडी येथे गायी दगावण्याच्या घटना झाल्याने संबंधित ठिकाणी आवश्यकतेनुसार लसीकरण करण्यात आले आहे. कुत्रा चावल्यानंतर 10 दिवसांनी जनावरांमध्ये लक्षणे दिसतात. सदर आजार हा संसर्गजन्य नाही त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजी करण्याचे कारण नाही. आजारी असलेल्या जनावरांना वेगळ्या ठिकाणी बांधणे, लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. बाधित जनावरांच्या दुधापासून कोणताही धोका नाही, असे राहुरी तालुका पशुधन विकास अधिकारी शैलेश बन यांनी सांगितले आहे.

बाधित जनावरांच्या मालकांनी संपर्क साधावा
तांदुळवाडी परिसरात गाईंना पिसाळलेल्या कुत्रा चावल्यामुळे संसर्ग झाला असल्यास अशा जनावरांच्या मालकांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधावा. जेणेकरून पुढील उपाययोजना करता येईल. गायींना पिसाळलेल्याचा संसर्ग झाल्याची बाब लपवून ठेवू नये, असे आवाहन तांदुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अमोल पेरणे यांनी केले आहे.

हे ही वाचा :

Shrikant Shinde | भाजप-शिंदे युतीमध्ये मिठाचा खडा! श्रीकांत शिंदे राजीनामा देतो असे का म्हणाले?

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यांसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज

Back to top button