नगरला अपर तहसील कार्यालय मंजूर; अध्यादेश जारी

नगरला अपर तहसील कार्यालय मंजूर; अध्यादेश जारी
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यात आले असून, नगर शहरासाठी आता स्वतंत्र अपर तहसील कार्यालयास मान्यता दिल्याचा अध्यादेश गुरुवारी आज शासनाने जारी केला आहे. या आदेशामुळे नगर शहरातील महसुली कामकाज आता स्वतंत्रपणे अपर तहसील कार्यालयातून मार्गी लागणार आहे. या कार्यालयात शहरातील नालेगाव, सावेडी, केडगाव, भिंगारव नागापूर या पाच महसुली मंडळातील 12 गावांचा समावेश आहे.

अहमदनगर तालुक्यात महापालिका असून, औद्योगीकरण, नागरीकरण व तालुक्यातील रहिवास क्षेत्राचा झपाट्याने झालेला विस्तार आदी बाबीमुळे सध्याच्या अहमदनगर तालुक्यातील तहसील कार्यालयावर कामकाजाचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे अहमदनगर शहरासाठी नवीन अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याची मागणी सातत्याने होत होती.

राधाकृष्ण विखे पाटील महसूलमंत्री झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे विखे यांनी यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना आदेश देऊन शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 22 नोव्हेंबर 2022 रोजी अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे दाखल झाला होता.

विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी नगर येथे 47 कोटी रुपये खर्चाच्या महसूल भवनाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात नगर शहरासाठी लवकरच अपर तहसील कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी (दि.19) राज्य शासनाने अहमदनगर तहसील कार्यालयाचे विभाजन करून शहरासाठी नवीन अपर तहसील कार्यालय मंजूर केले आहे. त्यासाठी सध्या तहसीलदार 1 व महसूल सहायक 1 लिपिकाचे पद देखील मंजूर केले आहे.

अहमदनगर तहसीलदार तसेच अपर तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळातील तलाठी व त्यामध्ये अंतर्गत होणार्‍या गावांची यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर करण्याचे निर्देश दिले आहेत. अपर तहसीलदार अहमदनगर यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि नियंंत्रक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी हे काम पाहणार आहेत. अपर तहसीलदार यांना कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे अध्यादेशात नमूद केले आहे.

अपर तहसील कार्यालयात समाविष्ट गावे

नालेगाव, मोरचूदनगर, माळीवाडा, चौराहा खुर्द व बुद्रूक, सावेडी, भिस्तबाग, केडगाव, भिंगार, नागापूर, नवनागापूर व बोल्हेगाव

नगर तहसीलदार कार्यालयात समाविष्ट गावे

11 मंडळातील 109 गावे :- नालेगाव (3) सावेडी (2), कापूरवाडी (9), केडगाव (8), भिंगार (14), नागापूर (12), जेऊर (12), चिचोंडी पाटील (13), वाळकी (10), चास (13), रुईछत्तीशी (13).

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news