अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : देशात भाजपला विकास करता आलेला नाही. महागाई, बेरोजगारी, सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे देशात भाजप विरोधी जनमत निर्माण झाले आहे. राहुल गांधीच देशाचे सक्षमपणे नेतृत्व करू शकतात, अशी जनभावना तयार झाली आहे. म्हणून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ व नगर शहराची विधानसभा जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे घ्यावी, अशी एकमुखी मागणी नगर शहरासह दक्षिणेतील सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी निरीक्षक माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरेंकडे केली आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या भावना मी कोअर कमिटी समोर मांडणार असल्याचे यावेळी हांडोरे म्हणाले.
दक्षिणेची आढावा बैठक नगर शहरात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. हंडोरे म्हणाले की, दक्षिणेची जागा काँग्रेसने लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. राज्याचे नेते आणि माझे सहकारी बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून ही जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी आम्ही टोकाचा आग्रह धरू. त्यासाठी मित्र पक्षांशी ही आम्ही चर्चा करू. त्यांना समजावून सांगू.
आ. लहू कानडे म्हणाले, ही काँग्रेसची सुवर्णभूमी आहे. ज्यांना काँग्रेसने भरभरून दिले त्यांनीच ताटात छेद केला. जिल्ह्यातील काँग्रेस थोरातांनी सांभाळली. अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना आधार दिला. जिल्ह्यातील दोन्ही जागा पक्षाने लढवाव्यात. ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, थोरातांची सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची प्रतिमा, महाविकास आघाडीला असणारे समर्थन यामुळे दक्षिणची जागा काँग्रेस नक्की जिंकेल. तर, वीरेंद्र किराड म्हणाले, शहरासह जिल्ह्यात काँग्रेस अधिक बळकट करायची आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू करावी.
यावेळी सचिन गुंजाळ, समिता गोरे, उत्कर्षा रूपवते, हेमंत ओगले, ज्ञानदेव वाफारे, अनिस चुडीवाला, डॉ. बापू चंदनशिवे, उषाताई भगत, विलास उबाळे, अलतमश जरीवाला, अभिनय गायकवाड, सुनील भिंगारदिवे, आकाश आल्हाट, प्रणव मकासरे, विकास भिंगारदिवे, राणी पंडित, सुनिता भाकरे, पूनम वंनम, रतिलाल भंडारी उपस्थित होते.
मनोज गुंदेचा, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे यांच्यासह शहरातील कार्यकर्त्यांनी लोकसभेला बाळासाहेब थोरात तर विधानसभेला शहरातून किरण काळेंना उमेदवार करण्याची जोरदार मागणी करत शहराच्याही जागेवर दावा केला. यापूर्वी आ.थोरातांनी स्वतःच किरण काळे शहराचे आमदार होतील, असे जाहीर भाष्य केले आहे. थोरात यांची भविष्यवाणी नगरकर खरी करून दाखवतील, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी निरीक्षक हंडोरें समोर व्यक्त केला.
हेही वाचा