भारतात आहे ‘आशियातील सर्वात स्वच्छ गाव’! | पुढारी

भारतात आहे ‘आशियातील सर्वात स्वच्छ गाव’!

शिलाँग : आशियातील सर्वात स्वच्छ गाव कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? असे गाव भारतातच आहे. मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील ‘मॉलिन्नोंग’ गावाला ’आशियातील सर्वात स्वच्छ गाव’ असा किताब मिळालेला आहे. हे निसर्गसंपन्न व टूमदार गाव आपल्या स्वच्छतेसाठी जगभर ओळखले जाते. या गावाला ‘गॉडस् ओन गार्डन’ (देवाचा स्वतःचा बगीचा) असेही गौरवाने म्हटले जाते. एका आदर्श गावाची सर्व वैशिष्ट्ये या गावात आहेत. गावातील स्वच्छतेबरोबरच येथील शंभर टक्के साक्षरता दर आणि महिला सशक्तीकरणासारखी अन्यही वैशिष्ट्ये प्रसिद्ध आहेत.

या गावात सुमारे 900 लोक राहतात. हे लोक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत. तिथे सुपारीची शेती केली जाते. उन्हाळ्यात तिथे अननस आणि लिची या फळांचेही उत्पादन घेतले जाते. या फळांना मेघालयाबाहेरही निर्यात केले जाते. गावात महिलांना मानाचे स्थान आहे. येथील बहुतांश लोक ‘खासी’ जनजातीचे आहेत. या जनजातीमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. येथील मुले-मुली आपल्या आईचे नाव लावतात आणि पैतृक संपत्ती सर्वात छोट्या मुलीला दिली जाते.

हे गाव आपल्या साफ-सफाईसाठी जगभर ओळखले जाते. तिथे बांबूपासून बनवलेल्या कचराकुंड्यांमध्ये कचरा एकत्र केला जातो आणि एका खड्ड्यात टाकला जातो. कालांतराने या कचर्‍याचे रूपांतर खतामध्ये झाल्यावर हे खत शेतीसाठी वापरले जाते. सर्व गावकर्‍यांना गावाच्या सफाई अभियानात सहभाग घेणे सक्तीचे आहे. याठिकाणी धूम्रपान आणि पॉलिथिनच्या वापरावर बंदी आहे. पावसाचे पाणी साठवण्यावरही इथे भर दिला जातो. गावात झाडांच्या मुळ्यांपासून पूल बनवले आहेत. गावात रंगीबेरंगी फुलांचे बगीचेही आहेत.

Back to top button