वळण : भरदिवसा जबरी चोरी, वृद्धेला मारहाण

file photo
file photo
Published on
Updated on

वळण; पुढारी वृत्तसेवा : भरदिवसा दुपारी 1 वाजता जबरी चोरी झाल्याची सिनेस्टाईल घटना राहुरी तालुक्यातील मानोरी शिवारात शनिवारी घडली. चोरट्यांनी केलेल्या जबर मारहाणीमध्ये 65 वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यावर 50 टाके पडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राहुरी येथे खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पोबारा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली वृद्ध महिला खरकत-खरकत घराबाहेर आली. तिला स्थानिकांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सरुबाई रामचंद्र खामकर (वय 65) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे डिवायएसपी बसवराज शिवपुजे म्हणाले.

राहुरीचे पोलिस फौज- फाट्यासह घटनास्थळी पोहोचले. तपासाची चक्रे फिरविण्यात आली. राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरातील गणपतवाडी येथे भर वस्तीत इंजिनियर लक्ष्मण रामचंद्र खामकर यांचा बंगला आहे. ते शनिवारी सकाळी पत्नी व मुलीला घेऊन देवीच्या दर्शनासाठी बाहेरगावी गेले होते.

घरी वृद्ध आई एकट्याच असल्याचा फायदा घेत मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बंगल्याच्या कंपाउंडमध्ये प्रवेश केला. दारावरची बेल वाजवून थेट घरात प्रवेश करीत वृद्ध सरूबाई खामकर यांना, 'आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे रिपेअर करायला आलो आहोत. साहेब कुठे आहेत,' अशी बतावणी करीत त्यांनी सरुबाईंच्या तोंडात बोळा कोंबून डोक्यावर गंभीर मारहाण केली. गळ्यातील सोन्याचे दागिणे व अन्य वस्तू घेवून त्यांनी धूम ठोकली.

वृद्ध सरुबाई घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. बाथरूम, बेडरूम व बैठक रूमपासून बाहेरपर्यंत सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. सरुबाई यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. घटनास्थळी राहुरीचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पो. उपनिरीक्षक पोपट कटारे, सहाय्यक फौजदार म्हातारबा जाधव, पो. काँ. प्रमोद ढाकणे यांनी भेट देऊन पाहणी केली.

तातडीने फॉरस्निक लॅब, ठसे तज्ज्ञांसह स्वान पथकाला पाचरण करण्यात आले. श्वान पथकातील पी. सी. गोसावी यांनी रक्षा श्वानाच्या माध्यमातून माग काढीत, धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु श्वान घरातच घुटमळले. चोरट्यांची घटनास्थळी एकही वस्तू आढळली नसल्याचे सांगण्यात आले.

जखमी सरुबाई यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटे दोघे होते. एकाने निळा टी-शर्ट तर दुसर्‍याने पिवळा टी-शर्ट परिधान केलेला होता. ते दोघेही तरुण होते. घटनास्थळी डॉ. सागर शेलार, नानाभाऊ शेलार, वैभव शेलार, सुमन शेलार आदींनी धाव घेत मदत केली. पो. पा. भाऊराव आढाव, सरपंच प्रतिनिधी बापूसाहेब वाघ आदींसह कार्यकर्ते ठाण मांडून होते. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बंगल्यात सीसीटीव्ही 13 तारखेपासून आहेत बंद..!

चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले असल्याने ते ओळखीचे असल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात भर वस्ती व भर दिवसा जबरी चोरीची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. खामकर यांच्या बंगल्यात सीसीटीव्ही 13 तारखेपासून बंद होते. 'आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी आलो,' असे चोरटे म्हटल्याने ते माहितगार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news