पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषकातील 21 व्या सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. कारण ही लढत होत आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात. धर्मशाला येथे हा महामुकाबला खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. विश्वचषक ट्रॉफीसाठी 12 वर्षांची प्रतीक्षा यावेळी संपुष्टात येईल, अशीही चाहत्यांना पूर्ण आशा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले आहेत. हा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत आज न्यूझीलंडला हरवल्याने टीम इंडियाला किती फायदा होईल आणि सेमीफायनल गाठण्यापासून किती पावले दूर आहे हे जाणून घेऊया.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना सहा गडी राखून जिंकला आणि स्पर्धेची मोहिमेची सुरुवात विजयाने केली. त्यानंतर रोहित शर्माच्या संघाने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध अनुक्रमे आठ, सात आणि सात गडी राखून सहज विजय मिळवला. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात असून, सर्व संघांना एकूण 9-9 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे क्वार्टर फायनल न होता थेट सेमीफायनलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे सेमीफायनल गाठण्यासाठी 7 सामने जिंकणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया आता सेमीफायनल गाठण्यापासून केवळ तीन विजय दूर आहे. जर रोहित सेनेने 5 पैकी 2 सामने जिंकले तर नेट रन रेटच्या आधारेही सेमीफायनल गाठण्यात यश येईल शकेल.
आतापर्यंत 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे एकमेव संघ आहेत ज्यांनी एकही सामना गमावलेला नाही. उर्वरित 8 संघांनी किमान एक सामना गमावला आहे. न्यूझीलंड देखील आपल्या मोहिमेची सुरुवात शानदार केली. त्यांनी सलामीच्या सामन्यातच गतविश्वविजेत्या इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. त्यानंतर नेदरलँड्सवर 99 धावांनी विजय मिळवला. त्याच्या पुढील दोन सामन्यांमध्ये, संघाने बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध अनुक्रमे आठ गडी आणि 149 धावांनी सहज विजय मिळवला. पण नेट रनरेटमुळे किवी संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत आज न्यूझीलंडला हरवले तर भारत पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवेल यात शंका नाही.
धरमशाला येथे उभय संघांमध्ये 7 वर्षांनंतर वनडे सामना होणार आहे. येथे टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना 2016 मध्ये खेळला गेला होता. भारताने तो सामना सहा गडी राखून जिंकला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना केवळ 190 धावा केल्या आणि संपूर्ण संघ 40 षटकांत सर्वबाद झाला. त्याचवेळी भारतीय संघाने 34 व्या षटकात 4 गडी गमावून धावसंख्येचा पाठलाग केला.