Nagar News : गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापना

Nagar News : गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापना

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  उर्ध्व गोदावरी खोरे अती तुटीचे आहे, त्यात पाणी वाढविल्याशिवाय त्याचे वाटप होऊ शकत नाही आणि नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा हा प्रादेशिक पाण्याचा वादही कमी होणार नाही. त्यासाठी राज्य सहकारी साखर संघाचे संचालक आणि माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक बिपीनराव कोल्हे यांनी गोदावरी खोरे पाणी कृती समितीची कोपरगावी स्थापना करून त्यामार्फत पाटपाण्याचा संघर्ष सोडविण्याचा विडा उचलला आहे. विवेक कोल्हे हे त्यांच्या वाढदिवसाला आजोबा स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आर्शिवादासाठी गेले होते.

त्यावेळी त्यांनी आजोबांना प्रश्न केला होता माझ्या वयात तुम्ही काय करत होता. त्यावेळी स्व. शंकरराव कोल्हे म्हणाले, साखर कारखाना काढून त्याचा अध्यक्ष झालो आणि समाजकारणातून गोर-गरीबांचे अश्रु पुसायाचे काम केले. बहुदा विवेक कोल्हे यांना आजोबांचे हेच शब्द कानी पडले असावे आणि त्यांनी नगर- नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाण्याचा वाद कमी करण्यासाठी गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापना करून त्यामाध्यमातून पाणीप्रश्न सोडविण्याची भुमिका मांडत मावळे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या 31 व्या वर्षी 1960 मध्ये संजीवनी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ रोवली. येसगावचे सरपंच झाले, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष होऊन 1972 मध्ये अपक्ष सिंह घेत विधीमंडळाची पायरी गाठली आणि पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. पाच वेळेस विधानसभा जिंकत अधिराज्य गाजवले. या काळात अनेक कामे मार्गी लावली. तसेच प्रश्न सोडविण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलने केली.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अतिशय कमी वयात सहकारी साखर कारखानदारी, ग्रामीण अर्थकारण, गाव पातळीवरच्या समस्या, साखर व उपपदार्थ, रासायनीक प्रकल्प, औषधनिर्माती, राजकारण, अर्थकारण, जिल्हा बँक, इफको, कृभको, साखर संघ, कोईमतुर जादा उत्पादन, उतारा देणार्‍या ऊस जाती, उपग्रहाच्या मदतीने ऊस व अन्य पीक उत्पादन, पोटॅश खत, सहवीज निर्मिती, सीएनजी गॅस प्रकल्प, गोदावरी, पालखेड, नांदुरमध्यमेश्वर, निळवंडे कालवे त्यांचे प्रश्न, प्रादेशिक पाणी योजना आदी प्रश्न जाणून घेत त्याचा चिकीत्सक अभ्यास केला.

आजोबांचे स्वप्न पूर्ण करणार
गोदावरी खोर्‍यात पाण्याची सुबत्ता आल्याशिवाय समन्यायी कायदा त्यातून जायकवाडीचा होऊ घातलेला पाणी प्रश्न याची सोडवणूक होणार नाही, म्हणूनच वैतरणेचे अतिरिक्त समुद्राला पश्चिमेचे वाहून जाणारे पाणी पुर्वेकडे वळविण्याचे आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापना करून त्याच्या झेंडयाचे मातोश्री स्नेहलता कोल्हे यांचे हस्ते अनावरण करून घेतले. शेतीला पाण्याची सुबत्ता निर्माण होण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांना सर्वांची साथ मिळावी, अशीच अपेक्षा चर्चेत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news