Pune News : मुलांना फटाक्यांपासून दूरच ठेवा! शिक्षण आयुक्त सूरज मांढरे | पुढारी

Pune News : मुलांना फटाक्यांपासून दूरच ठेवा! शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनावश्यक खरेदी, फटाक्यांचा धूर आणि आवाज यामध्ये आपण खरी दिवाळी हरवत चाललो आहोत, असे सांगत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी विद्यार्थ्यांना फटाके वाजविण्यापासून परावृत्त करावे, यासाठी साद घातली आहे. त्यासाठी सर्व शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांनाही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन मांढरे यांनी केले आहे.
सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे सर्वांना आवाहन केले आहे. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

दरवर्षी आपण सर्वजण दीपावली/दिवाळी हा उत्सव/सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो. हा सण ज्ञानाचा (प्रकाश) अज्ञानावर (अंधकार) विजय म्हणून प्रतीत होतो. दिवाळीचे स्वागत आकाशकंदील, किल्ले, नवनवीन फराळाचे पदार्थ, सुशोभित रांगोळी अशा अनेकविध पद्धतींनी करण्याची आपली परंपरा आहे. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे.

किल्ला तयार केल्यामुळे आपल्या ऐतिहासिक व भौगोलिक माहितीबरोबरच बांधकामशास्त्राची देखील ओळख मुलांना होते. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळून टाकाऊ वस्तूचा वापर योग्य पध्दतीने करून सुबकता शिकता येते. अनेक मुले एकत्र आल्याने मुलांमधील एकीचे बळ वाढते तसेच किल्ल्याचे संरक्षण आपली जबाबदारी आहे, हे आपोआप बालमनावर रुजविले जाते. आजची परिस्थिती पाहता, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारसांचे जतन ही काळाची गरज आहे, असे मांढरे यांनी म्हटले आहे.

सण साजरा करीत असताना फटाक्यांमुळे ध्वनी व वायू प्रदूषणाबाबत विचार होणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचा मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होत आहे. तापमानातील वाढ, समुद्रकिनार्‍यावरील नैसर्गिक आपत्ती, ध्वनिप्रदूषणातील वाढ इत्यादी यामुळे सर्वांचे जीवन दुःखमय होताना, ताणतणावामध्ये व्यतीत करीत असल्याचे सर्वांना जाणवत आहे. फटाके वाजविल्यामुळे निर्माण होणार्‍या ध्वनिप्रदूषणाचे होणारे दुष्परिणाम दूरगामी असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम हा घरातील लहान व वृद्ध व्यक्तींच्या शरीरावर तसेच रुग्णालयातील आजारी रुग्णांवर होण्याची शक्यता असते. त्यातून विविध जीवघेणे आजार अथवा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

भडक स्वरूप नको

वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, पाडवा आणि भाऊबीज या क्रमामध्ये सगळ्या धनसंपदा आरोग्य आणि विविध नात्यांची प्रेमळ गुंफण दडलेली आहे. या प्रत्येक दिवसाचा आनंद त्या-त्या दिवसाप्रमाणे घेणे हीच खरी दिवाळी. परंतु, आजकाल दिवाळी सणाला काहीसे भडक स्वरूप आले आहे. अनावश्यक खरेदी, फटाक्यांचा धूर आणि आवाज, यामध्ये खरी दिवाळी हरवत चाललो आहोत, अशी खंतही मांढरे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

Back to top button