कोपरगाव : दुष्काळी परिस्थिती जबाबदारीने हाताळावी

कोपरगाव : दुष्काळी परिस्थिती जबाबदारीने हाताळावी
Published on
Updated on

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी खरीप पिके पूर्ण जळून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला. पिण्याचे व शेतीचे पाणी, वीज, जनावरांचा चारा आदी प्रश्न गंभीर बनले आहेत. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदारीने दुष्काळी परिस्थिती हाताळून ठोस पावले उचलावीत, अश्या सूचना माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी प्रशासनाला दिली. कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकर्‍यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना भेटून पाटपाणी, विजेचा प्रश्न, गतवर्षी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून देण्यात येणारे अनुदान, पीक विमा तसेच नागरिकांना बिबट्यापासून होत असलेल्या त्रासाबाबत विविध मागण्यांचे निवेदन दिले.

तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि पाणी, चारा डेपो, वीज, अग्रीम पीक विमा वाटप व दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी कोल्हे यांनी तहसीलदार भोसले यांच्याकडे केली. सध्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला आवर्तन सुरू आहे. त्या आवर्तनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे तालुक्यातील बर्‍याचशा चार्‍यांना पाणी सोडलेले नाही. नागरिक व जनावरेदेखील पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत.

तसेच शेतकर्‍यांनी 7 नंबर अर्ज भरून देखील त्यांना शेतीसाठी पाणी मिळालेले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने सध्या सुरू असलेल्या खरीप पिकांच्या आवर्तनाचे व्यवस्थित नियोजन करावे वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतीसाठी 8 ताससुध्दा पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. विहिरीत उपलब्ध असलेले थोडेसे पाणी देखील शेतकर्‍यांना पिकांना देता येत नाही. त्यामुळे सततचे भारनियमन त्वरित बंद करून शेतीसाठी पूर्ण दाबाने सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबत महावितरण कंपनीस आदेश द्यावेत, तालुक्यातील सुरेगाव व पोहेगाव सर्कलमधील काही शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. सदर अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांना हे अनुदान तातडीने मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी, अशा मागण्या बैठकीत केल्या.

याप्रसंगी उपविभागाचे अभियंता सचिन ससाणे, महावितरणचे शाखा अभियंता योगेश सोनवणे, दीक्षित,भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, विश्वासराव महाले, माजी पं. स. सभापती शिवाजीराव वक्ते, माजी जि. प. सदस्य केशवराव भवर, राजेंद्र परजणे, कालूअप्पा आव्हाड, सतीश केकाण, सरपंच संदीप देवकर, रवींद्र आगवन, दीपक चौधरी, किसन गव्हाळे, विजय आढाव, आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकर्‍यांची आक्रमक प्रश्नांची सरबत्ती

या बैठकीत शेतकर्‍यांचा सध्य परिस्थिती विरोधात तीव्र असंतोष पहावयास मिळाला. शेतकर्‍यांनी आक्रमकपणे प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने स्नेहलता कोल्हे यांनी प्रशासनाला परिस्थिती जबाबदारीने हाताळण्याची सक्त ताकीद दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news