अहमदनगर : साडेपाच लाख शेतकर्‍यांनी उतरविला पीकविमा

अहमदनगर : साडेपाच लाख शेतकर्‍यांनी उतरविला पीकविमा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 5 लाख 46 हजार 340 शेतकर्‍यांनी अवघ्या एका रुपयात खरीप हंगामातील पिकांचा प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा विमा उतरविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट शेतकर्‍यांनी विमा उतरविला आहे. उर्वरित शेतकर्‍यांनी 31 जुलैपर्यंत पीकविमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

लहरी हवामानामुळे शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. अशा संकटातून झालेल्या आर्थिक नुकसानीतून वाचविण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना सात वर्षांपासून सुरू झालेली आहे. अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ आदी कारणामुळे शेतकर्‍यांचे पिके वाया जात आहे. अशा वेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी, हा योजनेचा मूळ हेतू आहे. आतापर्यंत विमा हप्ता भरण्यासाठी राज्य शासन आणि शेतकरी यांचा सामाईक हिस्सा होता. विमा हप्त्याची रक्कम अधिक असल्यामुळे शेतकरी पीकविमा भरण्याकडे कानाडोळा करीत आहेत. गेल्या वर्षी 2 लाख 23 हजार 226 शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते.

यंदाच्या खरीप हंगामासाठी मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने केवळ 1 रुपयांत पीकविमा उतरविण्याचा निर्णय घेऊन शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा दिला आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागातील अधिकारी तसेच कर्मचार्‍यांच्या वतीने गावोगावी पीकविमा योजनेचा जागर सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेणार्‍यांची भाऊगर्दी वाढली आहे.

23 जुलैपर्यंत 4 लाख 91 हजार 242 बिगर कर्जदारांनी, तर 13 हजार 96 कर्जदार अशा एकूण 5 लाख 46 हजार 340 शेतकर्‍यांनी विमा उतरविला आहे. उर्वरित शेतकर्‍यांनी 31 जुलैपर्यंत या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

जिल्ह्यात 73 टक्के खरीप पेरा

जिल्ह्यात 21 जुलैपर्यंत 4 लाख 21 हजार 215 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झालेली आहे. एकूण क्षेत्राच्या तुलनेत 73 टक्के पेरणी झालेली आहे. 1 लाख 23 हजार 999 हेक्टरवर कापसाची पेरणी झालेली आहे. सोयाबीन पेरणी 131 टक्के झाली आहे. तब्बल 1 लाख 14 हजार 716 हेक्टरवर पेरा झालेला आहे. बाजरीची पेरणी अद्याप 30 टक्क्यांवरच पोहोचली आहे. याशिवाय 112 टक्के तूर, 81 टक्के उडीद, 31 टक्के मुगाची पेरणी झालेली आहे. जवळपास 112 टक्के गळीत धान्याची पेरणी झालेली आहे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news