पुणे रेल्वे स्थानकावर ’रेस्टॉरंट ऑन व्हील’

पुणे रेल्वे स्थानकावर ’रेस्टॉरंट ऑन व्हील’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रवाशांना 24 तास खानपानाची सुविधा मिळावी, याकरिता पुणे स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून 'रेस्टॉरंट ऑन व्हील' या संकल्पनेवर आधारित रेल्वे डब्यामध्ये हॉटेलची सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्याची सुरुवात झाली असून, त्याकरिता रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूच्या पार्किंगमध्ये एक डबा उभा करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी पुणे विभागातील चिंचवड स्थानकावर अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली आहे. आता पुणे स्थानकावर याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यासंदर्भातील कार्यवाहीसुध्दा सुरू आहे. याचा ठेका रेल्वेने मेसर्स ओम इंडस्ट्रीजला दिला आहे. मागील प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात येणार्‍या 'रेस्टॉरंट ऑन व्हील'साठी रेल्वेने ट्रॅक, ड्रेनेज आणि आयुर्मान संपलेला डबा ठेकेदाराला दिला आहे. त्याची सजावट ठेकेदाराकडून होणार आहे. ठेकेदार रेल्वेला पाच वर्षांचा 3 कोटी 18 लाख रुपयांचा महसूल देणार आहे. रेल्वेचा आणि ठेकेदाराचा 5 वर्षांचा करार झाला आहे. रेल्वेचे आगामी काळात 'रेस्टॉरंट अँड व्हील'चे नियोजन पुणे विभागातील आकुर्डी, बारामती, मिरज या ठिकाणी आहे.

'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' या सुविधेमुळे लोकांना रेल्वेच्या डब्यातील रेस्टॉरंटचा अनुभव मिळणार आहे. यामुळे रेल्वेला महसूल तर मिळेलच; शिवाय लोकांच्या मनात रेल्वेची चांगली प्रतिमाही होण्यास मदत होईल.

– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी काहीतरी चांगले करीत आहे. याचा प्रवाशांसाठी नक्कीच फायदा होणार आहे. फक्त रेल्वे प्रशासनाने हा डबा येथेच जिन्याखाली उभ्या केलेल्या तिकिटाच्या डब्याच्या जागेवर उभारल्यास बाहेरून जाणार्‍या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

– हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news