सोलापूर : लघुशंकेसाठी थांबलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची पैशाची बॅग चोरट्यांनी पळवली | पुढारी

सोलापूर : लघुशंकेसाठी थांबलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची पैशाची बॅग चोरट्यांनी पळवली

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : लघुशंकेसाठी थांबलेल्या सेवानिवृत्त सैनिकाच्या मोटारसायकलला ३ लाख रुपये असलेली पैशाची पिशवी घेऊन मोटरसायकलवरील दोन चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना मोहोळ शहरापासून काही अंतरावर घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाफळे गावातील गोपीनाथ भानुदास दाडे हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथील कुरुल रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या खात्यातून घर बांधण्याच्या कामासाठी पैसे काढण्यासाठी (एम एच १३ ए वाय ६६९७) मोटरसायकल वरून वाफळे येथून मोहोळ येथे आले होते. स्टेट बँकेच्या खात्यातून पैसे काढून ते वाफळे गावाकडे जात होते. बँकेतून काढलेली तीन लाख रुपयांची रक्कम त्यांनी आपल्या पिशवीमध्ये ठेवून पिशवी मोटरसायकलच्या हँडलला अडकवली होती. दुपारी गावाकडे जाताना सोलापूर- पुणे रोडवर भारत पेट्रोल पंपावर त्यांनी पेट्रोल भरले व पंपाच्या पुढे काही अंतरावर लघुशंकेसाठी थांबवले. यावेळी ते गाडीवरून उतरताच पाठीमागून मोटरसायकल वरून दोन अनोळखी इसम त्यांच्या मोटरसायकल जवळ येवून थांबले. पाठीमागे बसलेल्या हिरव्या रंगाचा चौकडा शर्ट घातलेला व्यक्ती त्यांच्या मोटरसायकल जवळ गेला व अडकवलेली पैशाची पिशवी काढून घेऊन मोटरसायकलवरून नरखेड रोडच्या दिशेने निघून गेला. याबाबत गोपीनाथ दाडे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button