वाकडी रस्त्यांसाठी प्रयत्न करू : आ. काळे

वाकडी रस्त्यांसाठी प्रयत्न करू : आ. काळे

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा :  पुणतांबा -येलमवाडी मार्गे वाकडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरीसाठी हिवाळी अधिवेशनात प्रयत्न केले जाणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी शिष्टमंडाळाला सांगितले. पुणतांबा वाकडी हा आठ किलोमीटरचा रस्ता गणेश नगर, वाकडी, बाभळेश्वर, लोणी, कोल्हार, राहता येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. मात्र रस्त्यावर वेड्या बाभळींनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. तसेच ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाल्याने वाहन चालकांनी आपला मार्ग बदलला. परंतु या रस्त्यावर वस्ती करून सुमारे एक ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा अडचणीचा सामना करून रस्ता पार करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षापासून रस्त्याची दुरुस्तीच झाली नसल्याने हा रस्ता नकाशावर आहे की नाही असा प्रश्न नागरिक विचारीत आहे. जिल्हा परिषदेकडून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगावकडे वर्ग करण्यात आला. मात्र अद्याप खड्डेही बुजवण्यात येत नसल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

आ. काळे यांची नुकतीच या भागातील शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करून नागरिकांची परवड थांबवावी असे साकडे घातले. येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संपूर्ण आठ किलोमीटर रस्ता डांबरीकरणासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार असून यापुढे रस्ताच्या कामासाठी आंदोलन करू नये असे आ. काळे यांनी शिष्टमंडळाला सांगितले, यावेळी विनोद धनवटे, ज्ञानेश्वर धनवटे, बाळासाहेब पेटकर, सोमनाथ पेठकर, प्रकाश बनकर, सोपान धनवटे, रवींद्र शिंदे, असलम शेख, नवनाथ धनवटे, शकील शेख, दिलीप शिंदे, भूषण धनवटे, मनोज घोडेकर, हरीश पेटकर आदी उपस्थित होते.

नागरीकांची आंदोलने उपोषणे
रस्ता दुरुस्तीसाठी या भागातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने उपोषण तसेच खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला. परंतु रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news