राष्ट्रवादी पदाधिकार्‍यावर भाजप नगरसेवकाचा हल्ला ; जखमी अंकुश चत्तर यांची प्रकृती गंभीर

राष्ट्रवादी पदाधिकार्‍यावर भाजप नगरसेवकाचा हल्ला ; जखमी अंकुश चत्तर यांची प्रकृती गंभीर
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35, रा. पद्मानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर) यांच्यावर शनिवारी (दि. 15) रात्री 14 ते 15 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायरने डोक्यावर जबर मारहाण केल्याने चत्तर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर येत असून, या प्रकरणी भाजपच्या नगरसेवकासह 14 ते 15 जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी हॉस्टिलमध्ये जाऊन चत्तर यांची विचारपूस केली. या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभिजित बुलाखे, सूरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुर्‍हे, राजू फुलारी (सर्व रा. नगर) व इतर 7 ते 8 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अंकुश चत्तर यांचे नातेवाईक बाळासाहेब भानुदास सोमवंशी (वय 42, रा. गावडेमळा, पाईपलाईन रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटले आहे, की पाईपलाईन रोडवर एकविरा चौकात शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास अंकुश चत्तर यांच्या शेजारी राहणार्‍या आदित्य गणेश औटी या तरुणाचे काही जणांसोबत वाद झाले. त्यामुळे काय झाले हे पाहण्यासाठी चत्तर यांनी चंदन ढवण या तरुणाला पाठविले. चंदन भांडण सोडवीत असताना अंकुश चत्तर हेही तेथे पोहचले. चत्तर यांनी वाद घालणार्‍या मुलांची समजूत घालून त्यांना घरी पाठवून दिले. नंतर चत्तर व ढवण दोघेही घरी जाण्यासाठी निघाले, तेवढ्यात राजू फुलारी तेथे आला व म्हणाला, 'तुमच्याशी काही बोलायचे आहे, थोडा वेळ थांबा.' दोघेही थांबले.

काही वेळातच दोन मोटारसायकलवरून व दोन मोटारींमधून नगरसेवक स्वप्नील शिंदे व त्यांच्यासोबत काही जण तेथे आले. त्यातील बुलाखे, सूरज, विभ्या, कुर्‍हे व इतर 7 ते 8 जणांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे होते. कुर्‍हेच्या हातात गावठी पिस्तूलही (कट्टा) होते. आरोपींनी 'तुला जिवंत सोडणार नाही, तू स्वप्नील भाऊच्या नादी लागतोस काय?' असे म्हणत चत्तर यांच्यावर हल्ला चढविला. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते रस्त्यावर पडलेले असताना सूरज, बुलाखे, कुर्‍हे या तिघांनी लोखंडी रॉडने डोक्यात आघात केले.

आरोपीकडे गावठी कट्टा
या घटनेतील एक आरोपी महेश कुर्‍हे याच्या हातात गावठी कट्टा होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला, तेव्हा घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गावठी कट्टा सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चौकशीसाठी चौघे ताब्यात
अकुंश चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी नगरमधून पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, चौकशीसाठी आरोपींच्या संपर्कात असलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news