

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी व घरफोड्या करणार्या चोरट्यांचा पारनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्याकडून 5 लाख 70 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांनी 19 सप्टेंबर रोजी पहाटे हकीगतपूर राळेगण थेरपाळ येथील हनुमान मंदिरातून अॅम्प्लिफायर मशीन, बॅटरी, साउंड बॉक्स, माईक आदी वस्तू चोरून नेल्या. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस पथकास या गुन्ह्यात महिंद्रा कॅरी गाडीचा वापर केल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार आरोपीचा शोध घेत असताना हा गुन्हा भारत चव्हाण (वय 20, रा.खामकर झाप, ता. पारनेर) याने त्याच्या अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली.
संबंधित बातम्या :
त्यानुसार आरोपीला त्याच्या राहत्या घरी छापा टाकला. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन हा गुन्हा चार अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती दिली. त्याच्यासह एका अल्पवयीन साथीदाराच्या घरी जाऊन खात्री केली असता, त्याच्या घरी गुन्ह्यातील वस्तू मिळून आल्या. त्या जप्त केल्यावर त्याच्या घरासमोर आणखी वस्तू आढळून आल्या. विचारपूस केली असता त्याने अजून तीन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने पारनेर तालुक्यातील पानोली, राळेगण सिद्धी, जामगाव, भाळवणी, गाजदीपूर, कान्हूर पठार, तसेच इतर ठिकाणी कॅरी गाडीच्या साह्याने जाऊन चोर्या केल्याची कबुली दिली. त्यातील वस्तू जप्त केल्या आहेत. त्यामध्ये एकूण 9 गुन्हे उघड झाले असून, त्याच्याकडून 5 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलिस नाईक गहिनीनाथ यादव, गोरख गायकवाड, विवेक दळवी, सारंग वाघ, सागर धुमाळ, पोपट मोकाटे, मच्छिंद्र खेमनर, रवींद्र साठे, शाम गुजर, किसनराव औटी, होमगार्ड वैभव पांढरे, अभिजीत जाधव यांच्या पथकाचा सहभाग होता.