अहमदनगर : कोरोना मृतांच्या यादीत जिवंत व्यक्तींची नावे - पुढारी

अहमदनगर : कोरोना मृतांच्या यादीत जिवंत व्यक्तींची नावे

श्रीगोंदा ; पुढारी वृत्‍तसेवा

कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या नावाच्या याद्यांमध्ये सावळा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तींच्या यादीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील दोन जीवंत व्यक्तींची नावे आल्याने एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान आरोग्य विभागाच्या व्हेरिफिकेशनमध्ये ही नावे वगळण्यात आली. मृत व्यक्तींच्या यादीत जीवंत व्यक्तींची नावे आली कशी? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंब उध्वस्त झाली. या महामारीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा कुणी ना कुणी नातेवाईक मृत झाला आहे. या कोरोनाची झळ प्रत्येक कुटूंबाला बसली आहे. कोरोनाने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पन्नास हजार सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला.

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर जिल्हा प्रशासनाने मृत व्यक्तींच्या याद्या त्या- त्या तालुक्यांना पाठविल्या. श्रीगोंदा तालुक्यातील मृत व्यक्तींची यादी आरोय विभाग व महसूल विभागाला प्राप्त झाली. यादीतील मृत व्यक्तींच्या नावाची खातरजमा केली असता, या यादीमधील तीन मृत व्यक्ती जीवंत असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य विभागाचे पथक यादीतील मृत व्यक्तींच्या घरी गेले असता, यादीत जी व्यक्ती मृत दाखविली गेली होती. तीच व्यक्ती माहिती देण्यासाठी पुढे आल्याने आरोग्य विभागाचे पथक अवाक झाले. पथकाने तत्काळ याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिली.

दरम्यान, कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा तालुका प्रशासन लपवत असल्याचा आरोप बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर केला होता. आता याऊलट परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मृत व्यक्तींच्या यादीतून ही नावे वगळण्यात आली आहेत. नावे वगळली असली तरी या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जीवंत व्यक्तींची नावे मृत व्यक्तिंच्या यादीत आली कशी? यापाठीमागे काही वेगळी यंत्रणा कार्यरत तर नाही ना? सानुग्रह अनुदान लाटण्यासाठी हा प्रकार केला का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले असून याबाबत योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, जिल्हा पातळीवरून कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या नावाची यादी आली होती. या यादीतील मृत व्यक्तींबाबत व्हेरिफिकेशन केले असता, त्यामधील दोन व्यक्ती जीवंत असल्याचे आढळून आले. संबधित व्यक्ती कोरोनाबाधित होत्या. त्यांच्यावर पाथर्डी व नगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

मृतांचा आकडा ४५४

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ४५४ व्यक्ती मृत झाल्या. मृतांमध्ये तीस ते चाळीस वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक आहे. आरोग्य विभागाकडून मृत व्यक्तींच्या नावाची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे.

Back to top button