पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप : डॉ. मिथिला चव्हाण यांनी पटकावले चार सुवर्ण, एक रौप्य | पुढारी

पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप : डॉ. मिथिला चव्हाण यांनी पटकावले चार सुवर्ण, एक रौप्य

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा

तुर्की येथील इस्तंबूल येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आशियाई क्लासिक आणि पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना नाशिकच्या डॉ. मिथिला चव्हाण यांनी एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावत इतिहास रचला आहे. त्यांनी स्पर्धेमध्ये निर्विवाद एकतर्फी वर्चस्व निर्माण केल्याने संपूर्ण आशियामध्ये नाशिकचा डंका वाजला आहे.

दि. २४ ते ३० डिसेंबर दरम्यान तुर्की येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई क्लासिक आणि पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी भारताकडून डॉ. मिथिला चव्हाण यांची ५२ किलो वजनी गटासाठी निवड करण्यात आली होती. डॉ. मिथिला यांनी गेल्या तीन वर्षांपासून स्पर्धेत भाग घेण्यासाठी सराव सुरु केला होता. त्यांनी यापूर्वी राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भाग घेऊन रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आहे. त्या गेल्या बारा वर्षांपासून डेंटिस्ट म्हणून आपला व्यवसाय सांभाळत पॉवर लिफ्टिंगचा सरावदेखील करीत आहेत.

आशियाई क्लासिक आणि पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बेंचप्रेस, डेडलीफ्ट आणि स्कॉट या प्रकारामध्ये डॉ. मिथिला यांनी तीनही प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. त्यानंतर एकूण झालेल्या स्पर्धेतील गुणांची बेरीज केली असता, त्यामध्ये मिथिला या अव्वल राहिल्याने त्यांना चौथे सुवर्णपदक मिळाले. या कामगिरीमुळे भारतासह नाशिकच्या नावलौकिकामध्ये मोठी भर पडली आहे.

या स्पर्धेसाठी सर्व तयारी आणि सराव त्यांनी सी फोर फिटनेस आय येथे केला असून, त्यांना योगेश लोखंडे आणि संकेत चव्हाण यांनी प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी मिळविलेल्या देदिप्यमान यशामुळे आणि भारताचा गौरव वाढविल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

माझ्या देशाचा तिरंगा धारण करणे हे माझे स्वप्न होते. माझ्या देशाला अभिमान वाटावा असे यश मिळाल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. स्पर्धेसाठी आई, बाबा, भाऊ, बहिणी यांनी मनोबल वाढविले. गोल्ड इन आशियाई क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप इस्तंबूल स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न करून मदत करणाऱ्या महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंगचे सचिव संजय सरदेसाई, भारतीय पॉवरलिफ्टिंग फेडरेशन पी जे जोसेफ, माझे प्रशिक्षक योगेश लोखंडे, संकेत चव्हाण, सी फोर फिटनेस यांचे मी मनापासून आभार मानते.
– डॉ. मिथिला चव्हाण, नाशिक

Back to top button