कर्जतमध्ये प्रांत कार्यालयाबाहेर गोळीबाराचा थरार!

कर्जतमध्ये प्रांत कार्यालयाबाहेर गोळीबाराचा थरार!
Published on
Updated on

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादामधून कर्जतमध्ये प्रांत कार्यालयाबाहेर संदीप छगन मांडगे याने रिव्हॉल्वर मधून हवेत गोळीबार केला. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्या संदीप मांडगे यास अटक केली.

याबाबत भरत नामदेव मांडगे (वय 45, धंदा शेती, रा. रेहकुरी, ता. कर्जत) याने कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थान जमीन गट नं. 70.71,72,73 मध्ये एकूण 75 एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र अनेक वर्षांपासून आमच्या भावकीतील चार कुटुंबे ही शेत जमीन करीत होते. कोकनाथ महादेव मंदिराची आम्ही देखभाल करीत होतो. परंतु आमच्या भावकीतील संदीप छगन मांडगे याने वरील चारही शेत गटाची देवस्थानाच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याच्या घरातील सर्व अध्यक्ष व सभासद केलेले आहेत. संदीप छगन मांडगे याने इतर दुस-या भावकीतील लोकांचा काही एक संबंध नाही व इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे दावा दाखल केलेला आहे. त्यावरून मला व आमचे भावकीतील लोकांना काल दि.30 डिसेंबर रोजी उप विभागीय दंडाधिकारी कर्जत येथे तारीख असल्याने मी व आमच्या भावकीतील बरीच मंडळी तारखेस आली होती.

तारीख झाल्यानतंर मी, शांतीलाल बाबू मांडगे (वय 60) रोहीदास खंडू मांडगे (वय 75), शहाजी बाबू मांडगे (वय 55) आश्रू यशवंत मांडगे (वय 70), भानुदास यशवंत मांडगे (वय 80), हारीभाऊ आन्ना मांडगे (55), नारायण देवीदास मांडगे (50), आप्पा गंगाराम मांडगे (55), धनराज खंडू मांडगे (50) सर्व रा. रेहकुरी, ता. कर्जत, जि. अहमदनगर असे आम्ही सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कर्जत येथील उप विभागीय दंडाधिकारी कर्जत विभाग येथील गेटजवळ थांबलो असताना त्यावेळी संदीप मांडगे, सचिन मांडगे तेथे आले. त्यावेळी माझा चुलत भाऊ शहाजी बाबू मांडगे याने त्याची मोटरसायकल मला घरी घेवून जाण्याचे सांगितल्याने मी सदर मोटरसायकल घेवून घरी निघालो होतो. त्याचवेळी मला संदीप छगन मांडगे याने, तू मोटरसायकल घेवून जावू नको, खाली उतर असे म्हणून शिवीगाळ केली आणि दमदाटी करून मारहाण केली. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन झटापट झाली. या दरम्यान संदीप मांडगे याने त्याच्या कंबरेला लावलेली रिव्हॉल्वर काढून हवेत गोळीबार केला. त्यानतंर संदीप मांडगे हा तेथून निघून गेला.

याबाबत माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळास भेट देऊन आरोपीस हत्यारासह ताब्यात घेतले. याबाबत इतरांचे जीवित धोक्यात येईल अशी कृती करणे आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. रिव्हॉल्वर आणि बुलेट(गोळ्या) जप्त करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : 5 दिवसांचा प्रवास आणि गव्याच्या सुटकेचा थरार | Indian gaur rescue in sangli

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news