कोरोनाचा उद्रेक! नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर जवाहर नवोदय विद्यालयातील ५१ विद्यार्थी आणि शिक्षकांना लागण - पुढारी

कोरोनाचा उद्रेक! नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर जवाहर नवोदय विद्यालयातील ५१ विद्यार्थी आणि शिक्षकांना लागण

पारनेर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत आहे. ओमायक्रोनमुळे सर्वजण चिंतेत असताना पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय या केंद्रीय विद्यालयात तब्बल दोन दिवसांत 51 विद्यार्थ्यांसह शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने नागरिकांसह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयाला भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.

जवाहर नवोदय विद्यालयात दि. 24 रोजी काही विद्यार्थ्यांना कोरोना सदृश्य लक्षणीय असल्याने तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन शिक्षक, एक सफाई कामगार व तब्बल 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हाभर एकच खळबळ उडाली. त्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षकांची चाचणी करण्यात आली. तसेच विद्यालयातील काही शिक्षक गावात राहत होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील शोधून त्यांची चाचणी करण्यात आली. एकूण 406 विद्यार्थी व 50 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 51 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पालक व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे अशा आपल्या पाल्यांना घरी सोडण्याबाबत शाळा प्रशासनाकडे विनंती केली आहे. मात्र ती मान्य करण्यात आली नसून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे पालकांशी संवाद साधणार आहे. त्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.

पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी 47 जण हे पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर चार जण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती चांगली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकळी ढोकेश्वर येथील विद्यालयास भेट देणार आहेत त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

– शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार पारनेर

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Omicron Corona जाणून घ्या सर्व माहिती? डॉ. रमण गंगाखेडकर | All you need to know about Omicron Corona

Back to top button