Corona : १२ वर्षांच्या मुलाने कोरोनाला हरवले : ६५ दिवस कृत्रिम श्वासाने संघर्ष | पुढारी

Corona : १२ वर्षांच्या मुलाने कोरोनाला हरवले : ६५ दिवस कृत्रिम श्वासाने संघर्ष

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

(Corona)  काही गोष्टींना निव्वळ चमत्कारच म्हणावं लागतं. गंभीरीत्या कोरोना होऊन शरीरातील विविध अवयवांना इजा झालेली असतानाही त्यावर मात करण्याची किमया १२ वर्षांच्या मुलाने केली आहे. या मुलाला तब्बल ६५ दिवस कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवावं लागले होते; पण अखेर या मुलाने कोरोनाला हरवलं आहे. शौर्य असं या मुलाचं नाव आहे. (Corona)

इतके दिवस Extracorporeal Membrane Oxygenation वर, लहान मुलाला ठेवावे लागण्याची आशियातील ही पहिलीच नोंद ठरली आहे. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या हॉस्पिटलमध्ये या मुलावर यशस्वी उपचार करण्यात आले.

शौर्य मुळचा लखनऊचा आहे. लखनऊमध्ये त्याला कोरोनाची लागण झाली. फुफ्फुसांत संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवरही झाला. त्याची प्रकृती फारच गंभीर झाल्याने त्याला हवाईरुग्णवाहिकेच्या मदतीने हैदराबाद येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला हलवण्यात आले.

तिथे शौर्यला Extracorporeal Membrane Oxygenation वर ठेवण्यात आले. यामध्ये रक्त शरीराबाहेर एका यंत्रात घेतले जाते, तेथे रक्तातील कार्बनडाय ऑक्साईड बाहेरकडून रक्तात ऑक्सिजन पुरवला जातो. यामुळे फुफ्फुसांना विश्रांती मिळते.

शौर्यला ६५ दिवस अशा प्रकारे कृत्रिम श्वासोश्वास द्यावा लागला. हळूहळू त्याचे फुफ्फुस पुन्हा कार्यरत होऊ शकले. हे उपचार सुरू असतानाच शौर्यचे इतर अवयवांच्या स्थितीत सुधारणा व्हावी, असे प्रयत्न करण्यात आले. डॉक्टरांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.
डॉ. संदीप अटवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार करण्‍यात आले.

हेही वाचलं का? 

Back to top button