ठेकेदाराच्या बोगसगिरीने पाणीटंचाई! शेवगावात गुन्हा दाखल

ठेकेदाराच्या बोगसगिरीने पाणीटंचाई! शेवगावात गुन्हा दाखल
Published on
Updated on

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना योजनेच्या ठेकेदाराने टेंडर भरताना खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी नगरपरिषदेचे लेखापाल सुग्रीव पांडुरंग फुंदे यांच्या फिर्यादीवरून छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रायणी कन्ट्रक्शनचे सुनील मधुकर नागरगोजे यांच्याविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शेवगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

शेवगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 30) नगरपरिषद कार्यालयासमोर माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी मुक्काम ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आंदोलनाच्या दोन दिवस अगोदरच नगरपरिषदेने पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नगरपरिषदेचे लेखापाल सुग्रीव फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी होऊन छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रायणी कन्ट्रक्शनने निविदा भरतेवेळी सादर केलेले अनुभवाचे कागदपत्र शेवगाव नगरपरिषदेकडे जमा केले होते. या कागदपत्रांच्या तपासणीअंती ते पात्र ठरल्यानंतर आर्थिक तक्ता उघडून प्राप्त निविदांपैकी सर्वांत कमी दराच्या इंद्रायणी कन्ट्रक्शनला 12 मे 2023 रोजी निविदा स्वीकृतीचे पत्र देण्यात आले. त्यानुसार इंद्रायणी कन्ट्रक्शनने 1 कोटी 56 लाख 60 हजार रुपयांची मुदत ठेव पावती नगरपरिषदेकडे जमा केली होती.यावरून इंद्रायणी कन्ट्रक्शनला दि. 7 जून 2023 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला.

इंद्रायणी कन्ट्रक्शनचे सुनील मधुकर नागरगोजे यांनी बँक हमीपत्र सादर केल्याने त्यांना मुदत ठेव पावती परत करण्यात आली. त्यानंतर ई-मेलने बँक गॅरंटीची पडताळणी केल्यानंतर ती खरी असल्याचा मेलही प्राप्त झाला. मात्र, बँक गॅरंटीची रक्कम जास्त असल्याने नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता सचिन राजभोज यांना प्राधिकृत करून प्रत्यक्ष पडताळणी केली. या वेळी धक्कादायक माहिती समोर आली.

सुनील नागरगोजे यांनी जमा केलेली बँक गॅरंटी बनावट असल्याचे समोर आले. तसेच बीड जिल्ह्यातील किल्लेधारू नगरपरिषदेकडे कामाचा अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी केली असता तेही बनावट असल्याचे दि. 13 फेब्रुवारीच्या पत्रानुसार समोर आले. अनुभव प्रमाणपत्रही किल्लेधारू नगरपरिषदेच्या संचितेमध्ये आढळून आलेले नाही. तसेच या प्रमाणपत्राची जावक वहीमध्ये नोंद नसल्याचे समोर आले. या सर्व प्रकारावरून सुनील नागरगोजे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रायणी कन्ट्रक्शनने दिलेली बँक गॅरंटी व अनुभव प्रमाणपत्र बनावट कागदपत्राच्या आधारे सरकारची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात इंद्रायणी कन्ट्रक्शनचे सुनील नागरगोजे यांच्याविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कन्ट्रक्शनच्या फसवणुकीमुळे शेवगावकरांना आणखी काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने तीव्र चीड निर्माण झाली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news