जप्त मालमत्तांचा लिलाव करा : महापालिका प्रशासकांचे आदेश | पुढारी

जप्त मालमत्तांचा लिलाव करा : महापालिका प्रशासकांचे आदेश

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी सावेडी प्रभाग समिती कार्यालयाला अचानक भेट देऊन कर्मचार्‍यांच्या वर्कशीटची तपासणी केली. कर न भरणार्‍या काही मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. त्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया राबवा, असे आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले.

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आज अचानक सावेडी प्रभाग कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी आस्थापन विभागप्रमुख मेहर लहारे उपस्थित होते. आयुक्तांनी अचानक भेट दिल्याने कार्यालयातील कर्मचार्‍यांची धावपळ उडाली. आयुक्तांनी उपस्थित सर्व कर्मचार्‍यांची हजेरी घेतली. ज्या नागरिकांची करवसुली झाली नाही त्यावर जप्ती केली असणार्‍या मालमत्तेवर बोजा चढून लिलाव प्रक्रिया राबवावी. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून त्याचे साहित्य वाळू, वीट, खडी रस्त्यावर टाकली जात आहे, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कामकाजात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्यात येईल, असाही इशारा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला.

सर्वचे वर्कशीट तपासा

आयुक्त डॉ. जावळे यांनी प्रभाग अधिकारी उमाप यांच्याकडून कामचुकार कर्मचार्‍यांची माहिती घेत कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच सर्वच कर्मचार्‍यांचे वर्कशीट तपासणी मोहीम सुरू करावी, अशा सूचना आस्थापन विभाग प्रमुख मेहेर लहारे यांना दिल्या.

कर्मचार्‍यांना काढली नोटीस

सावेडी प्रभाग कार्यालयात सर्वत्र अस्वच्छता पाहण्यास मिळाली. त्यामुळे प्रभाग अधिकार्‍यांनी संबंधित कर्मचार्‍यांना नोटीस काढावी. उद्या सकाळी सर्व कर्मचार्‍यांनी सात वाजता कार्यालयात उपस्थित राहून स्वच्छता मोहीम राबवावी असा आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला.

हेही वाचा

Back to top button