अखेरच्या घटकापर्यंत पोहोचणे हाच ध्यास : राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन | पुढारी

अखेरच्या घटकापर्यंत पोहोचणे हाच ध्यास : राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : विकसित भारत संकल्प यात्रा हा समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प असून, मावळ तालुक्यातील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा मावळात आली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बुधवार (दि. 17) विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, पोलिस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, कान्हे ग्रामपंचायतचे सरपंच विजय सातकर, तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी सुधीर भागवत आदी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, पुणे शहराशी निगडित असल्याने मावळ तालुक्यात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. पुण्याशी जोडले गेल्याने या परिसराचे शहरीकरणही वेगाने होत आहे, मावळ तालुक्यात लेण्या, किल्ले, सिंचन प्रकल्प, घाट रस्ते आणि मोठ्या प्रमाणात फुलशेती असल्याने पर्यटन विकासाला खूप वाव आहे. नागरिकांना स्वच्छता सुविधा, आवश्यक वित्तीय सेवा, वीजजोडणी, गॅस सिलिंडर सुविधा, गरिबांना हक्काचे घर, खाद्य सुरक्षा, उपयुक्त पोषण, आरोग्य सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी यासारख्या शासनाच्या योजनांचा लाभ देणे हा विकसित भारत संकल्प यात्रेचा भर आहे. या सुविधांपासून वंचित असलेल्यांपर्यंत पोहोचणे हा यात्रेचा उद्देश आहे.

यात्रेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. लोकसहभागाद्वारे ही यात्रा यशस्वी होऊन पात्र लाभार्थ्यांना खर्‍या अर्थाने लाभ मिळू शकेल. यावर्षी ग्रामीण भाग आणि आदिवासी समाजाच्या विकासावर शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दीष्ट गाठण्यासाठी समाजातील वंचित घटकांचे जीवनमान उंचावणे गरजेचे आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून असा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना पुणे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावा मांडला.

या वेळी, मावळ तालुक्यातील विविध योजनांचा लाभ घेतलेल्या प्रतिनिधिक स्वरूपातील 20 लाभार्थ्यांना राज्यपाल बैस यांच्या हस्ते लाभ देण्यात आला. या वेळी लाभार्थी स्वप्नाली टाकळकर, निलेश ओव्हाळ यांनीही मनोगत व्यक्त केले, शिवाजी जराड यांनी सूत्रसंचालन केले तर गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी आभार मानले. कार्यक्रमस्थळी, विविध शासकीय योजनांचे कक्ष लावण्यात आले होते. पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

छत्रपतींच्या जिगरबाज सैनिकांचा मर्दमावळ्यांचा तालुका मावळ !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील जिगरबाज सैनिकांच्या ‘मर्द मावळ्यांचा तालुका’ म्हणून ओळख असलेल्या मावळ तालुक्यात आल्याचा आनंद होतोय, अशी भाषणाची सुरुवात करत राज्यपाल रमेश बैस यांनी मावळकरांची मने जिंकली; तर उपस्थितांनी राज्यपाल बैस यांच्या या वक्तव्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

हेही वाचा

Back to top button