

येथील बहुचर्चित बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणात दिलीप सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेने शहरप्रमुख पदावरून तत्काळ उचलबांगडी केली आहे. नगर शहर प्रमुख पदाला स्थगिती देण्याबाबत सामनातून अधिकृतपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन शहर प्रमुखाची नियुक्ती लवकरच केली जाईल, असेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोतवाली पोलिस ठाण्यात बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यात 22 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यात दिलीप सातपुते यांचाही समावेश करण्यात आला आहे. सातपुते सध्या पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे गुन्हा दाखल होताच शिवसेनेकडून सातपुते यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. नगर शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातपुते यांच्या पदाला स्थगिती देण्यात आल्याबाबत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. सामनातून याबाबत अधिकृतपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन शहर प्रमुख पदाची नियुक्ती लवकरच केली जाईल, असेही या वृत्तामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.