Nagar : तुकाई देवी मंदिरामध्ये चोरी | पुढारी

Nagar : तुकाई देवी मंदिरामध्ये चोरी

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तुकाई देवीच्या मंदिरातील देवीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम, असा एक लाख रूपयांपेक्षा जास्त ऐवज चांरट्यांनी लांबविला आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघड झाला. याबाबत एकनाथ देवराम शेळके यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवार दि.13 डिसेंबरच्या रात्री 6 नंतर व गुरूवार दि. 14 च्या सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरांनी देवीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम, असा एक लाख रुपयापेक्षा जास्त किंमतीचा ऐवज चोरुन नेला.

या मध्ये अंदाजे एक किलो ग्रॅम वजनाचा 30 हजार रूपये किंमतीचा देवीच्या समोर ठेवलेला चांदीचा पुरातन मुखवटा, 15 हजार रूपये किंमतीचे अर्धा तोळे वजनाचे मंगळसूत्र, सोन्याचे मनी व पळी असलेले देवीच्या मुखवट्यावरील दागिने, 5 हजार रूपये किंमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, 5 हजार रुपये किमतीचे एक 25 भार वजनाची चांदीची कपाळपट्टी, 15 हजार रुपये किमतीची एक भार वजनाचे चांदीची छत्री, 10 हजार रुपये किमतीचे एक भार वजनाचे चांदीचे पैंजण, 10 हजार रुपये किमतीचे एक अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मनी व पळी, 3 हजार रुपये किमतीचे 20 भार वजनाचे चांदीचे पैंजण देवीचे गाभार्‍यातील लोखंडी कपाटात ठेवलेले होते. त्या कपाटातून चोरट्यांनी ते काढून नेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती कळतात सुपा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जी. एल. वारुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक आहेर, हेमंत थोरात यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. गुरुवारी दुपारी डॉग स्कॉडही दाखल झाले होते.

हेही वाचा :

Back to top button