मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगात याचिका दाखल | पुढारी

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगात याचिका दाखल

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र बार असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेबद्दल बोलताना महाराष्ट्र बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राज पाटील म्हणाले की, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना आम्ही याचिकेची संपूर्ण माहिती दिली तसेच आमचे मत मांडले, आयोगाने आमचे मत ऐकले. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या प्रक्रियेनुसार, आयोगाच्या वतीने आम्हाला सुनावणीसाठी बोलावण्यात येईल, तसेच आम्ही दाखल केलेल्या याचिकेत आवश्यक पुरावेही जोडले आहेत. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी असलेली कागदपत्रेही सोबत जोडली आहेत. दरम्यान, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, ही आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यांना अलीकडच्या काळात कुणबी प्रमाणपत्र मिळाले, जे अनेक वर्षे मिळू शकले नव्हते त्यांचा बॅकलॉग भरून काढला जावा. संवैधानिक संस्था असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासमोर याचिका दाखल करून रस्त्यावर आवाज उठवणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्या आणि भावना आयोगासमोर मांडल्याचेही ते म्हणाले.

Back to top button