फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चौघे मयत | पुढारी

फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चौघे मयत

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : फसवणुकीच्या गुन्ह्यात पाथर्डी पोलिसांत मयत झालेल्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते मयत झालेले आहेत. त्यामुळे भविष्यात गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई केली जाणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संस्थेच्या नावाने लघु उद्योगासाठी घेतलेली जमीन अकृषक करून व बनावट लेआऊट करत, त्याची परस्पर खरेदी-विक्री केल्याप्रकरणी तालुक्यातील खरवंडी कासार येथील भगवानगड औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेशी संबंधित 45 जणांविरोधात सहकार विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

यातील चार आरोपी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मयत झालेले आहेत. सहकार खात्याचे उप लेखापरीक्षक महेंद्र तुळशीराम घोडके यांनी या संदर्भात 1 डिसेंबरला गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेचे चाचणी लेखापरीक्षण सहकार विभागाने केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाथर्डीच्या सहायक निबंधकांनी दिले. त्यानंतर या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र, ती करताना ज्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहोत, ते हयात आहेत की नाही, या मुद्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लघुउद्योग करण्यासाठी कायम खरेदीने खरवंडी कासार येथील भगवानगड औद्योगिक संस्थेने याच परिसरात शेतजमीन विकत घेतली होती. लघुद्योग करण्यासाठी ही जमीन अकृषक करून मिळावी, असा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केल्यानंतर महसूल प्रशासनाने ही जमीन बिनशेती करण्यास परवानगी दिली. परंतु, परवानगी मिळाल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी, संचालक व काही सभासदांनी मिळून संस्थेच्या 24 सभासदांसाठी 24 व संस्थेसाठी एक, असे एकूण 25 प्लॉट पाडून बनावट लेआऊट केले. स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेची फसवणूक केली.

काही सभासदांनी तक्रारी केल्यानंतर सहकार खात्याने चौकशी केली. यामध्ये संस्थेच्या नावाने घेतलेली जमीन संचालक मंडळ, सभासद यांनी स्वतःच्या नावाने करत, संस्थेची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींमध्ये ज्ञानदेव नामदेव खामकर, बन्सी बाजीराव खेडकर, हिरालाल माणिकचंद बोथरा व बाळासाहेब लक्ष्मण लोंढे या चार मृत व्यक्तींचा समावेश आहे. यातील बन्सी खेडकर हे पूर्वी पंचायत समितीचे सभापती सुद्धा होते. या चारही जणांच्या वारसांनी सहकार खात्याला त्यांचे मृत्यूपत्र दाखल केले असताना, आरोपींमध्ये त्यांचा समावेश केला आहे. भविष्यात मृत आरोपी दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात कोणती कारवाई केली जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Back to top button