

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : मोबाईलवर कोणालातरी मोठ्याने शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून, तीन जणांनी एकास गज व लाकडी बांबूने मारहाण करून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी सायंकाळी बोर्ले ते जवळा रस्त्यावरील पठाडे वस्तीजवळ घडली. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. शिवाजी रामदास चव्हाण (वय 32, रा.बोर्ले, ता. जामखेड) असे मयताचे नाव असून, सुरेश बाबुराव पठाडे, आदित्य उर्फ गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी (सर्व रा. जवळा फटा, पठाडे वस्ती, जवळा. ता. जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत. यातील पठाडे पितापुत्रांना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील शिवाजी रामदास चव्हाण हा आपल्या नातेवाईकांसमवेत 13 डिसेंबर रोजी बोर्ले ते जवळा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेला होता. सायंकाळी 7:45 च्या सुमारास शिवाजी चव्हाण हा हॉटेलच्या बाहेर मोबाईलवर मोठ्याने बोलत कोणालातरी शिवीगाळ करत होता. यावेळी तेथे आलेल्या सुरेश पठाडे याने त्याला शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली. याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन जोराचे भांडण झाले.
या भांडणाची माहिती मयत शिवाजी याचे वडील रामदास चव्हाण यांना समजताच, ते आपल्या पत्नीसह तातडीने त्या ठिकाणी मोटारसायकलवर पोहचले. यावेळी सुरेश पठाडे हा त्याच्या हातातील गजाने व आदित्य सुरेश पठाडे व एक अनोळखी इसम, असे तिघे शिवाजी यास मारहाण करत होते. यावेळी या ठिकाणी असलेले शिवाजीचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव मते (रा.मतेवाडी), फिर्यादीचा पुतण्या नीलेश अभिमान चव्हाण, तसेच मयताचे आई-वडील हे देखील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आरोपी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नंतर ते घटनास्थळाहून निघून गेले.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवाजी चव्हाण याच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता. घटनेची माहिती समजताच फिर्यादीच्या भावाची मुले दिलीप चव्हाण व अंकुश चव्हाण हे घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने खासगी वाहनाने जखमी शिवाजी यास जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरूवार दि. 14 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत वाखारे, जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. हवलदार संजय लोखंडे, पोलिस नाईक अजय साठे, अविनाश ढेरे, नवनाथ शेकडे, प्रवीण पालवे, प्रकाश जाधव यांनी तपास करीत पठाडे पितापुत्रांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.