India vs New Zealand : मालिका विजयाचा निर्धार

India vs New Zealand : मालिका विजयाचा निर्धार
Published on
Updated on

रांची : वृत्तसंस्था : भारत शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand) होणार्‍या दुसर्‍या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. यावेळी त्यांना मध्यक्रमातील फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माच्या जोडीने चांगली सुरुवात करत बुधवारी जयपूरमध्ये न्यूझीलंडला पहिल्या टी-20 लढतीत पाच विकेटस्ने

पराभूत केले होते. शीर्ष फळीतील फलंदाज आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारताला या लढतीत विजय मिळवता आला. रोहितचा प्रयत्न रांची येथे मालिका जिंकण्याचा असणार आहे जेणेकरून कोलकातामध्ये शेवटच्या लढतीत युवा खेळाडूंना संधी मिळू शकेल.

सध्या सुरू असलेल्या मालिकेत विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने तिसर्‍या स्थानी फलंदाजी करताना 42 चेंडूंत 62 धावा केल्या. भारतीय संघ सोपा विजय मिळवेल असे वाटत होते; पण श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांनी निराश केले. त्यामुळे सामना चुरशीचा झाला. (India vs New Zealand)

बर्‍याच काळानंतर भारतासाठी खेळणारा अय्यर फॉर्मात दिसला नाही. त्याने आठ चेंडूंत पाच धावा केल्या. भारतासाठी मजबूत बाजू सूर्यकुमार यादवची फलंदाजी राहिली. ज्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली.

अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विन यांची कामगिरी संघाच्या द़ृष्टीने महत्त्वाची ठरली. पाकिस्तान विरुद्ध टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामन्यातील खराब कामगिरीनंतर भुवनेश्वरला बाहेर करण्यात आले होते. मात्र, रोहित व राहुल यांच्या नेतृत्वाखालील नवीन व्यवस्थापनाने त्याला संधी दिली.

सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळताना त्याने आयपीएलमध्ये सहा सामन्यांत 7.04 च्या इकोनॉमी रेटने तीन विकेटस् मिळवले. जयपूरमध्ये त्याने 24 धावांत दोन विकेटस् मिळवल्या. अश्विननेदेखील 23 धावा देत दोन विकेटस् आपल्या नावे केल्या. शेवटच्या षटकात भारताच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना 41 धावा देऊन तीन विकेटस् मिळवल्यामुळे न्यूझीलंड संघाला 15 ते 20 धावा कमी पडल्या.

मध्यक्रम हा रोहितसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे फलंदाजी क्रमवारीत काही बदल होतात का हे पाहावे लागेल. न्यूझीलंड विरुद्ध क्षेत्ररक्षण करताना गोलंदाज मोहम्मद सिराजच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. नाणेफेक यावेळीदेखील दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. टीम साऊदीला आपल्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तर, पहिल्या लढतीत अर्धशतक झळकावणार्‍या मार्टिन गुप्टिल व मार्क चॅपमन यांच्याकडेदेखील सर्वांच्या नजरा असतील.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे (India vs New Zealand)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड : टीम साऊदी (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, अ‍ॅडम मिल्ने, डॅरेल मिचेल, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटेनर, टीम सीफर्ट, ईश सोढी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news