

करंजी : पुढारी वृत्तसेवा : तिसगाव (ता. पाथर्डी) येथील ग्रामपंचायत मालकीच्या गट नंबर 296 मधील अनधिकृत बांधकामांचे काल मोजमाप सुरू करण्यात आले. या वेळी पाथर्डी पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. नंतर नागरिकांनी नमती भूमिका घेतल्याने विनाअडथळा पुढील मोजमाप करण्यात आले. सकाळी 11 वाजता गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधकामे मोजण्यास सुरुवात झाली. तिसगावातील गट नंबर 296 मधील ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर अनेकांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. तसेच या गटातील कोष्टी व परिट समाजाच्या गायब झालेल्या स्मशानभूमीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (छत्रपती संभाजीनगर) याचिका दाखल झाली आहे.
संबंधित बातम्या :
दीडशे दिवसांमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीने संयुक्त वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आता 100 दिवस पूर्ण झाले असून उर्वरित दिवसांत संपूर्ण कागदपत्रांची जुळवाजुळव करून न्यायालयात या गट नंबरमधील बांधकामांबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे या गटातील ग्रामपंचायतीने बांधलेले गाळे भाडेतत्त्वावर दिले. तसेच काहींनी अधिक भाडे घेऊन भाडेतत्त्वावर दिले. काहींनी या गाळ्यांची परस्पर विक्री केल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायतीने जे गाळे भाडेतत्त्वावर दिले. त्यावेळी या गाळ्यांचा आकार आणि आज भाडेकरूंनी वाढवलेली गाळ्यांंचा आकार यामध्ये मोठी तफावत आहे. तसेच काही लोकांनी अनधिकृतपणे या गटात पक्की बांधकामे केली आहेत. त्याची कुठेही ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही.
काहींनी या गटासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनंतर घाईघाईत ग्रामपंचायत दप्तरी नोंदी करून घेण्याचा प्रयत्नही केला. काहींनी अनेक वर्षे या गटात केलेल्या बांधकामाची अथवा घेतलेल्या गाळ्यांंची भाडे व घरपट्टी भरली नव्हती. ती ग्रामपंचायतीकडे भरली आहे. या गटात कोष्टी व परिट समाजाची स्मशानभूमी होती. ती आज सापडत नाही. स्मशानभूमीच्या जागेत केलेली पक्की बांधकामे कळीचा मुद्दा ठरणारी आहेत. स्मशानभूमीसह पुरातन बारव अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केली. ऐतिहासिक वास्तूवर काही लोकांनी अतिक्रमणे केली. गोरगरीब लोकांना याच गटात ग्रामपंचायतने घरकुले बांधण्यासाठी जागा दिल्या आहेत. या घरकुलांचे काय होणार? कालच्या मोजणीत पंचायत समितीचे उपअभियंता यू. एम. केकाण, आर. के. राजळे, ए. टी. बोराडे, एस. व्ही. केदार, एम. पी. इसारवाडे यांनी सहभाग घेतला. एकूण 300 हून अधिक बांधकामांची मोजणी करण्यात येणार आहे.