वसुली करणारे आता पक्षात नाहीत ; खासदार डॉ. कोल्हे यांचा गौप्यस्फोट | पुढारी

वसुली करणारे आता पक्षात नाहीत ; खासदार डॉ. कोल्हे यांचा गौप्यस्फोट

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असतानाही मला मतदारसंघात दौरा करण्यासाठी परवानगी घ्यावी लागायची, टोल दिल्याशिवाय मतदारसंघात फिरतादेखील येत नव्हते, परंतु आता हे टोल वसूल करणारेच पक्षात नसल्याने मी मुक्तपणे दौरे करू शकतो, माझ्या लोकांना, मतदारांना भेटू शकतो, असो मोठा गौप्यस्फोट शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केला. महाविकास आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा व मोर्चेबांधणी करण्यासाठी राजगुरूनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पदाधिका-यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी वरील गौप्यस्फोट केला.

या बैठकीसाठी महाविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष देवदत्त निकम, देवेंद्र बुट्टेपाटील, भारती शेवाळे, काँग्रेसचे नेते व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, हिरामण सातकर उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीत मित्र पक्षाच्या काही पदाधिका-यांनी कोल्हे यांना आता तरी मतदारसंघात फिरण्याची गरज आहे, लोकांना भेटले पाहिजे, मतदारसंघाचे दौरे केले पाहिजेत अशी मागणी केली. यावर आपल्या भाषणात उत्तर देताना कोल्हे यांनी यापूर्वी मला मतदारसंघात फिरण्यासाठी पक्षातील काही लोकांची परवानगी घ्यावी लागत होती, मतदारसंघात जाण्यासाठी अनेक टोल होते, आता हे टोल घेणारेच पक्षात नसल्याने आपण मुक्तपणे मतदारसंघाचा दौरा करू शकतो. गेले दोन महिन्यापासून मी मतदारसंघात फिरत असून, लोकांच्या भेटीगाठी घेत असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

केंद्र शासनाने कांद्याचे निर्यात मूल्य वाढवल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून, अनेक मागण्या प्रलंबित आहेत. शेतक-यांच्या अडचणी, प्रश्न समजावून घेण्यासाठी केंद्र सरकारला वेळच नाही. तसेच नव्याने साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी हा विषय आपण समजावून घेतला असून, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आपण हा प्रश्न मांडणार असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

खेडच्या शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठकीकडे पाठ
खेड तालुक्यात होत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी जुन्नर, आंबेगावसह मतदारसंघातील सहाही तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी बैठकीसाठी आवर्जून उपस्थित होते. परंतु, खेड तालुक्यातील शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक पदाधिका-यांनी महाविकास आघाडीच्या या बैठकीकडे पाठ फिरवली.

Back to top button