पोषण आहारात अंडी नकोच ; जैन समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा | पुढारी

पोषण आहारात अंडी नकोच ; जैन समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

नगर : पुढारी वृत्तसेवा : शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव देण्याचा निर्णय अंडी उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी असला, तरी राज्यातील जैन समाज, वारकरी संप्रदाय तसेच शाकाहारी नागरिकांच्या भावनांना ठेच पोहोचविणारा आहे. पूर्ण शाकाहारी असलेल्या नागरिकांची येणारी पिढी मांसाहारी बनविण्याचे शासनाचे षडयंत्र आहे. सकल जैन समाज व शाकाहारी नागरिक हे कदापि सहन करणार नाही. हा अध्यादेश तत्काळ मागे घ्यावा अन्यथा सकल जैन समाज व शाकाहारी नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा व भाजपचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी दिला आहे.

राज्य शासनाने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करणाचा अध्यादेश मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन सकल जैन समाज व शाकाहारी नागरिकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना दिले. या वेळी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी प्रमुख प्रतीक्षा कोरगावकर, रवींद्र बाकलीवाल, शांतीलाल गुगळे, माधव केरे महाराज, मुकुल गंधे, अशोक जोशी आदींसह नागरिक उपस्थित होते. अंड्यांमुळे विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होत असल्याचा उल्लेख अध्यादेशामध्ये आहे. अंड्यांपेक्षा इतरही अनेक शाकाहारी पदार्थांमध्ये उच्च प्रतीचे पोषणमूल्य असतात. त्यामुळे फक्त अंडी देणे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा उद्देश आहे का, असा सवालदेखील उपस्थित करण्यात आला.
या वेळी अनिल कटारिया, जयकुमार मुनोत, महावीर गोसावी, महावीर बडजाते, संजय महाजन, प्रशांत मुथा, अजित कटारिया, संपतलाल बोरा, सागर पटवा, सागर शिंदे, सुहास पाथरकर आदींसह मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Back to top button