Pune : कचरा डेपो हलविण्यासाठी विद्यार्थिनी करणार उपोषण | पुढारी

Pune : कचरा डेपो हलविण्यासाठी विद्यार्थिनी करणार उपोषण

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील गावठाण हद्दीतील शाळेलगत असणार्‍या कचरा डेपोने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा डेपो हलवावा, या मागणीसाठी गावातीलच 12 वर्षांच्या विद्यार्थिनीने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.कुंजीरवाडी ग्रामपंचायतीचा गावठाण हद्दीत कचरा डेपो आहे. मात्र, गावचा विस्तार वाढल्याने दिवसेंदिवस कचरा विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली आहे. या डेपोमुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. ओला व सुका कचर्‍याचे विघटन करण्याची प्रक्रिया या ठिकाणी नाही. त्यामुळे कचर्‍याची विल्हेवाट लावली जात नाही.

या ठिकाणी मृत जनावरेही टाकली जातात तसेच कचरा पेटविलादेखील जातो. त्याचा त्रास ग्रामस्थ व शाळांतील विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. या कचरा डेपोच्या हस्तांतरणाची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीची इच्छाशक्ती नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्षे ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. ग्रामपंचायतीने कचरा डेपो हलवावा, यासाठी आता गावातीलच 12 वर्षीय शाळकरी मुलीने उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. याची दखल घेत ग्रामपंचायत पावले उचलणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button