Nagar News : मसाला कंपनीत कामाच्या बहाण्याने महिलांना लाखोंचा गंडा | पुढारी

Nagar News : मसाला कंपनीत कामाच्या बहाण्याने महिलांना लाखोंचा गंडा

नगर तालुका : रंगीत संगीत पार्ट्या आणि पैशाच्या आमिषाला तथाकथित गावातील नेतेच भुलले आणि त्यांच्या साक्षीने पंचक्रोशीतील हजारावर महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नगर शहराजवळ असलेल्या जेऊर येथे घडला आहे. मसाला कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने महिलांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. त्यासाठी कंपनीचा अधिकारी बनून आलेल्या तोतयाला स्थानिक नेत्यांनीच साथ दिल्याने दुष्काळजन्य परिस्थितीत कशीबशी दिवाळी साजरी करणार्‍या गोरगरीब महिलांवर फसवणुकीची संक्रांत ओढवली आहे.

नेवासा तालुक्यातील एका गावचा रहिवासी असलेल्या या तोतयाने जेऊर पंचक्रोशीत गेल्या सहा महिन्यांपासून ही फसवणूक केली आहे. परिसरात नामांकित ब्रँडची मसाला कंपनी टाकणार असून त्यासाठी महिलांची नोकरभरती होणार असल्याचे त्याने सांगितले. नोकरीसाठी फॉर्म फी म्हणून 70 आणि प्रशिक्षणासाठी 250 असे प्रत्येकी 320 रुपये घेतले. अशाच विविध ‘स्कीम’ सांगून महिलांकडून पैसे उकळले. त्यासाठी त्याने ठरावीक नेत्यांनाही हाताशी धरले. त्यांना दररोज उंची हॉटेलांमध्ये रंगीत संगीत पार्ट्यांचा रतीब चालूच होता. पैसे देणार्‍या प्रत्येक महिलेमागे नेत्यांना कमिशनही देण्याचे आमिष दाखवल्याची चर्चा आहे. ओल्या पार्ट्या आणि पैशाच्या आमिषामुळे नेत्यांनीही आपापल्या परिसरातील गल्लोगल्ली बैठका घेऊन महिलांकडून पैसे गोळा केले. स्थानिक नेते असल्याने महिलांनीही विश्वास ठेवला आणि प्रसंगी कर्ज काढून, या ‘मसाला योजने’त पैसे गुंतविले. पैसे घेताना स्थानिक नेते, तोतया अधिकारी आणि त्यांच्यासोबत एक महिलाही येत असल्याचे गावातील महिलांनी सांगितले.

हा सर्व उद्योग करताना स्थानिक नेते सोबत असल्याने तोतया अधिकार्‍याला भीती नव्हती. स्थानिक नेत्यांंनाही पार्ट्या आणि पैशांचे आमिष यामुळे सत्यता तपासावीशी वाटली नाही. त्यामध्ये काहीजण एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, तर काहींनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी म्हणून आणि सहकारी संस्थेतही काम केले आहे. तरीदेखील त्यांनी या तोतयाला मदत करण्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न महिला उपस्थित करत आहेत. दरम्यान, ही फसवणूक असल्याची कुणकुण महिलांना लागताच पवारवाड्यातील महिलांनी दारूच्या नशेत तर्र असलेल्या तोतया अधिकार्‍याला पकडून चोप दिला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, तोतया आणि त्याला मदत करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनीच लक्ष घालावे आणि महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे.

प्रत्येकी 320 ते 4000 रुपये उकळले
या तोतयाने महिलांकडून मसाला कंपनीत नोकरीसाठी प्रत्येकी 320 रुपये घेतले. जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थानच्या संस्थानकडून लॅपटॉप मिळणार असल्याचे सांगून प्रत्येकी सहाशे रुपये, मोपेड कंपनीतर्फे दुचाकीसाठी एक हजार रुपये, सुकन्या योजनेत 4 हजार रुपये भरल्यास 70 हजार मिळणार अशा आमिषाने प्रत्येकी चार हजार रुपये लाटले. यात घरकुल मिळण्याचेही आमिष दाखवून दहा हजार रुपये आणि 26 जानेवारीला जन्मलेल्यांना 71 हजार रुपये मिळण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी चार हजार रुपये घेण्यात आले. अनेकांना मोबाईल टॉवर उभारून मोठे भाडे मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत पैसे उकळल्याची माहिती मिळत आहे. असा एकूण किमान 70 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

कंपनीचे उद्घाटन नि महिलांना जेवणही…
पवार वाडा, आरे गल्ली तसेच वाघवाडी येथे मसाला कंपनी होणार असल्याचे तोतयाने सांगितले. त्यासाठी गावामध्ये एक जागा भाडेतत्त्वावर घेऊन तेथे गावातील प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत कंपनीचे उद्घाटनही करण्यात आले. तसेच प्रत्येक महिलेकडून आधार कार्ड, पासबुक झेरॉक्स, फोटो जमा करण्यात आले. वैद्यकीय तपासणीसाठीही पैसे उकळले गेले. ट्रेनिंगच्या नावाखाली ठरावीक महिलांना तारकपूर (नगर) परिसरातील एका हॉटेलवर जेवण देण्यात आले. त्या वेळीही गावातील नेतेमंडळी हजर होती.

हेही वाचा :

Back to top button