

ढोरजळगाव : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील मळेगाव-शे येथे एसटी बसच्या चाकाखाली सापडून एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मळेगाव येथील शेवगाव-नगर रस्त्याच्या बाजुला राहणार्या वनवे कुटुंबातील श्लोक गणेश वनवे हा घराकडून मळेगावाकडे सायकलवर जाताना म्हस्के यांच्या वीटभट्टी समोर समोरून रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्नात असताना अचानक समोरून राहुरीच्या दिशेने जाणारी शेवगाव-राहुरी बस (एम.एच.40 वाय 5428) बस चालकाला अंदाज न आल्याने श्लोकची सायकल बसच्या पुढील चाकाला धडकून बसच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :
ही घटना लक्षात येताच बसचा चालक फरार झाला आणि बसमधील प्रवासी इतर वाहनाने निघून गेले. घटनेची माहिती समजतात रस्त्यावर मोठा जमाव जमला होता. यावेळी शेवगावचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालय पाठवून देण्यात आला. श्लोक हा मळेगाव येथील कर्डिलबावस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत असून, त्याचे वडील सोलापुरात पोलिस दलात कार्यरत आहेत. दरम्यान, हलगर्जी वाहन चालवून अपघात केल्याबद्दल शेवगाव आगाराचे चालक शहादेव लक्ष्मण गोरे (रा.जोहरापूर, ता.शेवगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शेवगाव-नगर मार्गावर रस्ता अरुंद
शेवगाव-नगर मार्गावर रस्ता अरुंद असून, दुतर्फा अनेक ठिकाणी वेड्या बाभळीची झाडे आहेत. त्यामुळे समोरून येणार्या वाहन चालकाला वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. यामध्ये अनेक बळी गेले असून, काही जण जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीकडे गंभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी सरपंच रघुनाथ सातपुते यांनी सांगितले.