नगर जिल्ह्यातील 539 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती

नगर जिल्ह्यातील 539 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 585 खरीप हंगामी गावांपैकी 549 गावांतील पिकांची सुधारित पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. यामध्ये संगमनेर व अकोले तालुक्यांतील सर्वच गावांचा समावेश आहे. प्रत्यक्षात पीक कापणी प्रयोगानंतर 15 डिसेंबर रोजी खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. या पैसेवारीत ज्या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असतील त्या त्या गावांना दुष्काळी सवलती जाहीर केल्या जातात. सुधारित पैसेवारीत 94 टक्के गावांतील पीक परिस्थिती खराब दिसून आली. पिकांना पावसाच्या तुटीचा फटका बसून, अंतिम पैसेवारीत सर्वच खरीप पिकांची पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

पिकांच्या पैसेवारीवरच गावांची दुष्काळी वा सुकाळ परिस्थिती निदर्शनास येते. खरीप पेरणी झाल्यानंतर 15 सप्टेबर रोजी पिकांची नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली जाते. जिल्ह्यात 585 खरीप गावे आहेत. त्यापैकी यंदा नजर अंदाज पैसेवारीत 261 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी तर 324 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आली होती. नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाल्यानंतर दीड महिन्यांने सुधारित पैसेवारी जाहीर केली जाते. 71 महसूल मंडलांत पावसाचा सलग 21 दिवस खंड पडला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. एकंदरीत खरीप पिकांची परिस्थिती नाजुक आहे. त्यामुळे सुधारित पैसेवारीत 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी अपेक्षित होती.

31 ऑक्टोबर रोजी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी खरीप हंगामातील पैसेवारी जाहीर केली आहे. 585 खरीप गावांपैकी तब्बल 94 टक्के म्हणजे 549 गावांत पिकांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. मात्र नगर तालुक्यातील 5 व पारनेर तालुक्यातील 31 अशा 36 गावांतील पिकांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आली आहे. या गावांतील पिके सुस्थितीत असल्याचे सिध्द होत आहे.

खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केरण्यापूर्वी पीक कापणी प्रयोग केला जातो. पीक कापणी प्रयोगानंतर पैसेवारी निश्चित केली जाते. या कापणी प्रयोगात ज्या गावांची पैसेवारी कमी येईल, त्या गावांना दुष्काळी सवलती मिळणार आहेत. त्यामुळे अंतिम पैसेवारी जाहीर होण्यासाठी शेतकर्‍यांना 15 डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, अंतिम पैसेवारीची वाट न बघता पावसाची तुटी लक्षात घेऊन राज्य शासन 15 डिसेंबरपूर्वी देखील सर्वच खरीप गावे दुष्काळी जाहीर करण्याची शक्यता आहे. शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील 40 तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. त्यामुळे दुसर्‍या, तिसर्‍या टप्प्यात दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता वाढली आहे.

रब्बीतील 665 गावांचीही पैसेवारी कमी
जिल्ह्यात 1 हजार 21 रब्बी हंगामी गावे आहेत. रब्बी गावांत 2/3 किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आल्यास त्या रब्बी गावांची देखील खरीप पैसेवारी घेतली जात आहे. नजर अंदाज पैसेवारीत 842 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आली होती. केवळ 179 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली होती. सुधारित पैसेवारीत मात्र 665 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी तर 356 गावांची पैसेवारी अधिक आली आहे.

50 पैशांपेक्षा अधिक पैसेवारीची गावे
पारनेर : 31
अहमदनगर : 5फ

कमी पैसेवारीची गावे
अकोले : 191
संगमनेर : 174
कोपरगाव : 16
राहाता : 24
राहुरी : 17
नेवासा : 13
पाथर्डी : 80
शेवगाव : 34

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news