ऐन सणासुदीत 51 गावांमध्ये पाणीटंचाई ; पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित

ऐन सणासुदीत 51 गावांमध्ये पाणीटंचाई ; पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  थकित वीजबिलामुळे शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यांतील 51 गावांची पाणी योजना थकित वीजबिलाच्या भोवर्‍यात सापडली आहे. दर वेळी महिना सहा महिन्यांतून वीजबिल थकल्याने या योजनेचा वीजपुरवठा खंडित होत आहे. आता योजनेची जवळपास 2 कोटी 50 लाख रुपये चालू वीजबिलाची थकबाकी झाल्याने 31 ऑक्टोबर रोजी योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. शेवगाव व पाथर्डी नगरपरिषद, तसेच दोन्ही तालुक्यांतील लाभार्थी गावात मोठ्या प्रमाणात योजनेची थकबाकी झाली आहे.

संबंधित बातम्या :

परिणामी, अमरापूर येथील शुद्ध पाणी उपसा केंद्रातून पाथर्डी तालुक्यातील काही टंचाईग्रस्त गावांना टँक्करद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाल्याने तेथील नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. आता पिण्याच्या पाण्याचाही दुष्काळ सुरू केल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. या योजनेची जवळपास 2 कोटी 50 लाख रुपये चालू, तर 9 कोटी 85 लाख रुपये मागील थकबाकी आहे. तीन महिन्यांपूर्वी फक्त 30 लाख रुपये वीज बिल भरणा केला होता. त्यानंतर वसुलीअभावी बिल भरले नसल्याची माहिती आहे.

सदर योजनेमध्ये 1 एप्रिल ते 30 सप्टेेंंबर 2023 अखेर शेवगाव नगर परिषदेकडे 6 कोटी 72 लाख 24 हजार 705 रुपये, तर पाथर्डी नगरपरिषदेकडे 3 कोटी 30 लाख 7 हजार 420 रुपये थकबाकी आहे. त्याचबरोबर पाथर्डी ग्रामीण लाभार्थी गावांची 15 कोटी 81 लाख तर शेवगाव ग्रामीण लाभार्थी गावांची 26 कोटी 50 लाख 6 हजार 710 रुपये थकबाकी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news