पारनेर : पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. सत्तेच्या बाजूला असलो तरी, आरक्षणाच्या मागणीसाठी प्रसंगी आगामी हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याची मराठा आमदारांनी तयारी केली असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. मुंबईतील नीलेश लंके प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार लंके यांच्या संकल्पनेतून शनिवारी मुंबईस्थित पारनेरकर महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून एकविरा देवीच्या दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्ले येथे एकविरा मंदिराकडे जाताना आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या साखळी उपोषण आंदोलनास आमदार लंके यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.
संबंधित बातम्या :
यावेळी आमदार लंके म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून लढा उभारला आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधव साखळी उपोषण करीत असून, आपण त्यांच्या आंदोलनास पाठिंबा जाहिर करीत आहोत. मराठा आरक्षणासाठी प्रत्येक गावागावात लढा सुरू असून, आपल्या मतरदारसंघातही आंदोलन सुरू आहे. शुक्रवारीच सकल मराठा समाजाचे समन्वयक तसेच तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला पत्र देऊन आपला या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. सत्ता किंवा राजकारण नंतर, अगोदर आपला समाज महत्त्वाचा आहे. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने येणार्या अडचणी आपण अनुभवल्या आहेत.
या प्रश्नावर आपल्यासह अनेक मराठा आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या भावना त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या लढ्याला यश आले पाहिजे, यासाठी राज्यात क्रांतीकारी आंदोलने सुरू असून, या आरपारच्या लढ्याला निश्चित यश येईल, असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला.