Pune News : नऊ महिन्यांत 600 बाळांना जीवदान  | पुढारी

Pune News : नऊ महिन्यांत 600 बाळांना जीवदान 

पुणे; पुढारी वृत्तसेवा : औंध जिल्हा रुग्णालयात कमी वजनाच्या किंवा कमी दिवसांच्या बाळांना स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट अर्थात नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचार दिले जातात. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत गेल्या नऊ महिन्यांमध्ये येथे 605 बाळांना जीवदान मिळाले आहे. औंध जिल्हा रुग्णालयात स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट अर्थात् विशेष नवजात शिशू अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. येथे व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसह 24 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये ’एसएनसीयू’मधील उपचारांसाठी एका दिवसाचा खर्च पाच ते सहा हजार रुपये इतका येतो. जिल्हा रुग्णालयात मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने गरजू रुग्णांना लाभ होत आहे.
कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या बाळांना येथे आवश्यकतेनुसार एक ते दीड महिना उपचार दिले जातात. काही बाळांना जन्मत: कावीळ, शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे, श्वसनाचे विकार, फिट येणे, हृदयविकार, व्यंग अशा आजारांवर एसएनसीयूमध्ये उपचार केले जातात, अशी माहिती एसएनसीयू विभागप्रमुख डॉ. सुरेश लाटणे यांनी दिली.

प्रत्येक बेडला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर

औंध जिल्हा रुग्णालयात 2013 मध्ये स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट अर्थात नवजात शिशू अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. या विभागात प्रत्येक बेडला ऑक्सिजन सुविधा असून, एक व्हेंटिलेटर आहे. येथे 2 डॉक्टर, 15 परिचारिका आणि 3 कांगारु मदर केअरटेकर असा स्टाफ आहे.
कमी वजनाच्या आणि कमी दिवसांच्या बाळांना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी नवजात शिशू अतिदक्षता विभागात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 605 बाळांवर उपचार करण्यात आले आहेत.
– डॉ. नागनाथ यमपल्ले, 
जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय.
हेही वाचा

Back to top button