Nagar News : आमदार राम शिंदे यांच्याकडून आमदार पवारांना पुन्हा धक्का | पुढारी

Nagar News : आमदार राम शिंदे यांच्याकडून आमदार पवारांना पुन्हा धक्का

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली तुकाई उपसा जलसिंचन योजना तीन वर्षे जाणीवपूर्वक रखडविल्याने जलसंपदा विभागातील एका अधिकार्‍यावर मंत्रालय स्तरावरून कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना आणखी एक धक्का दिला आहे. कर्जत तालुक्यातील आवर्षण प्रवण भागातील चिंचोली, डिकसळ, बिटकेवाडी, शिंदे, वालवड, गुरव पिंपरी, यासह सुमारे 25 ते 30 गावांसाठी महत्त्वपूर्ण असणारी तुकाई उपसा जलसिंचन योजना आमदार शिंदे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून आणली होती व तिचे कामही सुरू केले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेचे काम रखडले होते.

संबंधित बातम्या :

राज्यात पुन्हा भाजप व शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यावर राम शिंदे यांची विधान परिषदेवर निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा या योजनेचा पाठपुरावा सुरू केला. नुकतीच मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या दालनात यासंदर्भात विशेष बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार शिंदे यांनी अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
तुकाई उपसा जलसिंचन योजना केवळ अधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे रखडल्याचे त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिले. यास जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली होती. मंत्री राठोड यांनी या मागणीची दखल घेत तुकाई उपसा जलसिंचन योजनेत दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली आहे. यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सर्व अधिकार्‍यांना दिला संदेश
आमदार शिंदे यांनी यापूर्वी कामांत कुचराई करणार्‍या प्रांताधिकारी, तहसीलदारांवर राज्य सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले होते. आता जलसंपदाच्या अधिकार्‍यावर कारवाई झाली आहे. या माध्यमातून आमदार शिंदे यांनी सर्वच अधिकार्‍यांना मतदारसंघात प्रामाणिकपणे जनतेची कामे करा, अडवणूक करू नका, राजकारण करू नका, असा संदेश दिला आहे.

Back to top button