Navratri 2023 : मोहटादेवीला तांबूल प्रसाद प्रिय !

Navratri 2023 : मोहटादेवीला तांबूल प्रसाद प्रिय !
Published on
Updated on

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  मोहटादेवीला भाविकांकडून विविध प्रकारचे नैवेद्य व प्रसाद अर्पण केला जातो. यामध्ये प्रामुख्याने आगळा वेगळा आणि देवीला अतिशय प्रिय असणारा तांबूल प्रसाद तयार करण्यासाठी देवस्थान समिती व महिला भाविकांची लगबग सुरू आहे. तांबूल प्रसाद करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आजही देवस्थान समितीकडून सुरू आहे. माहूरच्या रेणुका मातेला मोठ्या प्रमाणात तांबूलचा प्रसाद अर्पण करून तो भाविकांना वाटला जातो. मोहटादेवी हे माहूरच्या रेणुकामातेचे अंशात्मक स्वयंभू स्थान आहे. त्यामुळे मोहटादेवीलाही तांबूलच्या प्रसादाचे महत्त्व प्राप्त आहे. तांबूल प्रसाद तयार करण्यासाठी प्रामुख्याने नागिणीचे पान व इतर 14 प्रकारचे पदार्थ टाकले जातात. त्यामध्ये कात, चुना, सुपारी, ज्येष्ठमध, बडीशेप, धना डाळ, गुलकंद, आसमानतारा, लवंग, विलायची, गुंजपाला, खोबर्‍याचा किस, जायफळ या पदार्थांबरोबर नागिणीचे पान खलबत्त्यामध्ये कुटून त्याचा बारीक भुगा केला जातो. तो होणारा भुगा म्हणजे देवीचा अतिशय प्रिय असणारा तांबूल प्रसाद होय.

संबंधित बातम्या :

अनेक भाविक तांबूलचा प्रसाद तयार करण्यासाठी नागिणीचे पान व इतर पदार्थ देवीचरणी अर्पण करतात. या सर्व पदार्थांचे एकत्रित मिश्रण करण्याचे काम देवस्थान समितीकडून होते. घटी बसणार्‍या महिला भाविक व ब्राह्मण पुजारी यांच्या कुटुंबातील महिला देवीची गाणी म्हणत देवीचा तांबूल प्रसाद मोठ्या भक्तीभावाने तयार करतात. नवरात्र उत्सवात पहिल्या माळेपासून ते पौर्णिमेपर्यंत या पंधरा दिवसाच्या कालावधीत तांबूल प्रसाद रोज मोहटादेवीला ठेवला जातो. दरम्यान, सहाव्या व सातव्या माळ्याच्या निमित्ताने मोहटादेवी गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह विविध भागातून भाविक पायी चालत मोहटादेवी गडावर गर्दी करत आहे. अहमदनगर येथील देवीभक्त वाहतूक व्यावसायिक राजू बलभीम सानप यांनी मोहटादेवीच्या मंदिर गाभार्‍यात आकर्षक अशी सुंदर फुलांची सजावट केली आहे.

आम्ही सर्व महिला भगिनी देवीचा प्रिय असणारा तांबूल प्रसाद करतो. यामध्ये स्वयंस्फूर्तीने आमचा सहभाग असतो. यानिमित्ताने देवीची सेवा घडते.
                                                                        – मंजुषा भूषण साकरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news